

Every poor person should get reservation: Mla. Amit Gorkhe
बीड, पुढारी वृत्तसेवा देशातील प्रत्येक गरीब समाजघटकाला आरक्षणाचा हक मिळालाच पाहिजे. मात्र, हा हक्क देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची कुठेही पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे सदस्य तथा भाजपचे अनुसूचित समाजाचे नेते आ. अमित गोरखे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मराठा आरक्षणावर सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देताना गोरखे म्हणाले की, आरक्षण हा खऱ्या अर्थान गरीब, वंचित आणि खऱ्या पात्र घटकांचा हक्क आहे. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून संविधानाची मोडतोड होणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक चौकटीला धक्का पोहोचेल, असे काही होऊ नये. आरक्षण हे अधिकारांसाठीचे शख आहे, राजकारणाचे साधन नव्हे.
आ. गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सर्वात आधी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र, आज त्यांनाच टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे आंदोलन केवळ राजकीय हेतू साधण्यासाठी वापरले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसते. भाजपने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अनुसूचित जातीतील कार्यकर्त्याला विधान परिषदेवर नेऊन सन्मान दिला असल्याची नोंद गोरखेंनी यावेळी घेतली. ते म्हणाले की, हे पद फक्त सन्मानापुरते मर्यादित नाही. या माध्यमातून अनुसूचित जातीतील तब्बल ५९ जातींचे प्रतिनिधित्व मी करत आहे.
मागील वर्षभर समाजाच्या अपेक्षा, अडचणी आणि भवितव्य यांचा अभ्यास करून समाजातील तरुणांना योग्य प्रवाहात आणण्याचे काम आपण सुरू केले आहे. केवळ घोषणांपुरते नाही, तर कुटुंबाचा भार समर्थपणे उचलण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे ही खरी जबाबदारी आहे. महामंडळाच्या माध्यमातून आपण ही जबाबदारी निभावत आहोत.
समाजातील तरुण सक्षमपणे उभा राहावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आ. अमित गोरखें यांचे आज बीड जिल्ह्यात सर्वच समाजाच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले असून त्यांनी भाजपची जी भूमिकामांडली त्या भूमिकेशी जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील युवक युवती तसेच समाजातील वंचित घटकाचे समाधान झाले असून त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणार असल्याचा समाजाने एकमुखाने निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक गरीब समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, आरक्षण मिळवताना बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
लवकरच मेगा भरती; श्रेणी सुधारणा होणार
राज्यात येत्या काळात मेगा भरती होणार असून अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड श्रेणी मध्ये आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा केल्या जातील, असे गोरखेंनी जाहीर केले. त्यामुळे समाजातील पात्र तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असून, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रात नवे दरवाजे खुले होतील.