

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होणार, असा ठाम विश्वास पक्ष निरीक्षक अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केला. बीड नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बीड येथील हॉटेल अन्विता येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीचे आयोजन शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी केले होते.
बैठकीला वैद्यनाथ बँकेचे उपाध्यक्ष रमेश कराड, भाजप राज्य परिषदेचे सदस्य अरुण राऊत, माजलगाव मंडलाध्यक्षा रूपाली कचरे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, शिवाजी मुंडे, अजय सवाई, गणेश लांडे, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, पालसिंगणकर, उपस्थित होते. मुंदडा म्हणाले, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्या तळागाळापर्यंत पक्षाची पाळेमुळे रुजवली, त्याच वाटेवर चालत लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यभर यात्रांच्या माध्यमातून भाजपचा विचार घराघरात पोहोचवला.
त्यांच्या नेतृत्वात आणि डॉ. प्रितम मुंडे यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यात आज भारतीय जनता पार्टी ही अजेय संघटना बनली आहे. स्थानिक पातळीवर परस्पर समन्वय साधून जिथे ताकद, तिथे उमेदवार या तत्वावर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्याचेही स्पष्ट केले.