A drunken father killed his son at Khanapur
माजलगाव : पुढारी वृत्तसेवा
माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला. ही घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली. रोहीत गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव आहे. गोपाळ विठ्ठल कांबळे असे संशयित आरोपी बापाचे नाव आहे.
या विषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलगा आणि संशयित आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला.
घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस पोउपनि आकाश माकणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संशयित आरोपीला घटनास्थळावरून अटक केली.
गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्ख्या नात्यातील लोकांचा खून पाडण्याच्या जवळपास आठ घटना घडल्या आहेत. अंबाजोगाईच्या येल्डा येथे मुलाने आपल्या आईचा, तर परळीत पुतण्याने चुलतीच्या नरडीचा घोट घेतला होता. माजलगावातच एका ढाबा चालकाचा मर्डर करण्यात आला होता. तो देखील दारूच्या बीलावरूनच झालेला होता. आता खानापूर येथील ही घटना देखील दारूच्या नशेतच झाली आहे.
दारूच्या व्यसनातून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. आता संख्खे भाउ, वडिल आणि मुलगा, जन्मदात्या आईला दारूच्या पैशांसाठी मारणे यासारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाजात वाढत चाललेल्या आहेत. स्वैराचार, वाढती व्यसनाधिनता यामुळे यामुळे या घटना वाढत आहेत. कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि अशा घटनांना पायबंद घालण्याची गरज आज निर्माण झाली आहे.