

Indian Army receives Russian Igla-S missiles
दिल्ली : भारतीय लष्कराला रशियाकडून अत्याधुनिक इग्ला-एस क्षेपणास्त्रे मिळाली आहेत, ज्यामुळे देशाच्या हवाई संरक्षण क्षमतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडता यावेत म्हणून त्यांना तैनात केले जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या क्षमतेत मोठी भर पडली आहे. रशियन बनावटीची अत्याधुनिक ‘इग्ला-एस’ (Igla-S) प्रकारची एअर डिफेन्स क्षेपणास्त्रे लष्कराला नुकतीच प्राप्त झाली आहेत. भारतीय लष्कराने रशियासोबत केलेल्या २६० कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्रे पुरवण्यात आली असल्याचे वृत्त ANI ने दिले आहे. ही क्षेपणास्त्रे आता सीमांवर तैनात केली जात असल्याने पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराची क्षेपणास्त्र क्षमता आणखी मजबूत झाली आहे.
इग्ला-एस ही १९९० च्या दशकापासून वापरात असलेल्या इग्ला क्षेपणास्त्रांची प्रगत आवृत्ती आहे. खांद्यावर चालणारी इग्ला-एस ही सुधारित आवृत्ती आहे, ज्याची इंटरसेप्शन रेंज ६ किलोमीटरपर्यंत आहे. ही क्षेपणास्त्र लढाऊ विमाने, ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांना काही मीटर अंतरावरूनच लक्ष्य करून पाडू शकतात. अगदी एका सैनिकाच्या खांद्यावरून चालवता येणाऱ्या या प्रणालीमुळे भारतीय सीमेवर हवाई आक्रमणांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. या क्षेपणास्त्रांची खरेदी केंद्र सरकारच्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत करण्यात आली आहे. सुमारे २६० कोटींचा हा करार आहे. पश्चिम सीमेवर विशेषतः पाकिस्तानच्या दिशेने हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी ही तैनाती केली जात आहे.
भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडून हवाई आणि ड्रोन धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. या क्षेपणास्त्रांच्यामुळे भारतीय सैन्याची क्षमता, वेग आणि अचूकतेत वाढ झाली आहे. संरक्षण सूत्रांच्या मते, भारतीय सैन्याला हवाई संरक्षण वाढवण्यासाठी अधिक उपकरणे मिळणार आहेत.