हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कोविड काळात पीएम केअर फंडासाठी देशभरातील जनतेने मदत केली. तो निधी कोठे खर्च केला, त्याचा हिशेब द्यावा, मगच भाजपाने भ्रष्टाचारावर बोलावे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शुक्रवारी (दि.३०) औंढा नागनाथ येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.
अंबादास दानवे (Ambadas Danve) हिंगोली जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी औंढा नागनाथ येथे भेट दिली. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील, माजी आमदार संतोष टारफे, नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब मगर गोपू पाटील सावंत, तालुका प्रमुख गणेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, कोविड काळातील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. त्यासाठी मोर्चे काढण्याचे इशारे दिले जात आहे. मात्र, कोविड काळात पीएम केअर फंडामध्ये देशभरातील लाखो नागरिकांनी मदत केली. त्याचा हिशेब त्यांनी द्यावा. पंतप्रधान निधी मधून राज्यात देण्यात आलेले व्हेंटीलेटर बोगस होते, असा आरोप त्यांनी केला. सदर निधी कुठे खर्च केला त्याचा हिशेब देऊन मगच भ्रष्टाचारावर बोलावे. भाजपने देशातील जनतेला शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकार आता पर्यंतच्या इतिहासातील अपयशी सरकार असून असे सरकार आपण आजपर्यंत पाहिले नाही.
सरकारने आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अतिवृष्टीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या आमदारांना मंत्री मंडळात समाविष्ट केल्यास राज्यात अवैध व्यवसायाला राजकीय मान्यता मिळेल. अन् याचीच महाराष्ट्र वाट पाहतोय का ? हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा