कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा फटका बसत आहे. पूरग्रस्त भागातील पाणी जोपर्यंत दुष्काळी भागाकडे वळवत नाही तोपर्यंत महापुराचा फटका बसणार आहे. हा प्रश्न तातडीने सोडविला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस यांनी आज शुक्रवारी चिखली (ता. करवीर) येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पर्यायी जमिनींचा प्रश्नही तातडीने सोडविला पाहिजे, अशी मागणीही केली.
ते म्हणाले, 'दर दोन वर्षांनी कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा फटका बसतो. त्यात उद्ध्वस्थ झालेल्यांना उभा करणे हे सरकारचे काम आहे.
पुरातून उभे राहताना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. त्यामुळे सरकारने तातडीने मदत केली पाहिजे.'
ते पुढे म्हणाले, 'पुढील काळात पुराबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील काळात जगणे मुश्किल होईल.
पुराबाबत आपल्याला कायमस्वरुपी उपाय शोधायचे असतील तर या भागातील पाणी दुष्काळी भागात नेण्याचे नियोजन करायला हवे.
या नद्यांमधील पाणी हे केवळ महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या वाट्याचे नाही. त्यावर अन्य महाराष्ट्राचाही हक्क आहे.
त्यामुळे जोपर्यंत हे पाणी बोगद्यांद्वारे दुष्काळी भागात नेले जात नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.
आमच्या सत्ताकाळात हा प्रस्ताव आम्ही आणला तो मंजूर झाला. जागतिक बँकेनेही त्याला मंजुरी दिली होती.
मात्र, सरकार गेल्याने हा प्रश्न मार्गी लागला नाही.'
हेही वाचा
पहा व्हिडिओ: बाप्पांच्या आगमनाची लबगब सुरू
https://youtu.be/WP-ddRXXXTI