आईसलँड हे बुडालेल्या खंडाचे टोक? | पुढारी

आईसलँड हे बुडालेल्या खंडाचे टोक?

लंडन : पृथ्वीच्या पाठीवर आशिया, आफ्रिका असे अनेक खंड आहेत. संशोधकांना वाटते की आईसलँड हा देशही अशाच एका बुडालेल्या खंडाचे टोक असू शकतो. हा खंड अमेरिकेतील टेक्सास शहराइतका मोठा असू शकतो. त्याला संशोधकांनी ‘आईसलँडिया’ असे नाव दिले आहे. उत्तर अटलांटिक महासागरात हा खंड सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी बुडालेला असू शकतो.

जिओफिजिस्ट आणि जिओलॉजिस्टच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने याबाबतचा नवा सिद्धांत मांडला आहे. हा सिद्धांत उत्तर अटलांटिक आणि आईसलँडच्या निर्मितीबाबतच्या प्रचलित समजास छेद देणारा आहे.

या महासागराच्या तळाची भूगर्भीय वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा तसेच आईसलँड च्या खाली असणारा पृथ्वीचा क्रस्ट अपेक्षेपेक्षा अधिक जाड का आहे हे उलगडून दाखवणारा हा सिद्धांत आहे.

मात्र, आतापर्यंत याबाबत जे पुरावे गोळा करण्यात आले आहेत त्यावरून ‘आईसलँडिया’ खंडाच्या अस्तित्वाची पुष्टी होऊ शकत नाही असेही काही संशोधकांनी म्हटले आहे.

गिलियन फौल्गर यांनी ‘इन द फूटस्टेप्स ऑफ वॉरेन बी. हॅमिल्टन : न्यू आयडियाज इन अर्थ सायन्स’ या पुस्तकात ‘आईसलँडिया’ हे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्यामध्ये हा नवा सिद्धांत मांडण्यात आला आहे.

Back to top button