बलात्कार प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

बलात्कार प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांच्या बालिकेस खाऊसाठी पैसे देतो म्हणून घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अक्या ऊर्फ आकाश सिद्धाराम शिंदे (वय 21, रा. सोलापूर) याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू.एल.जोशी यांनी हा निकाल दिला.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला ही 5 मे 2017 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करत होती.

त्यावेळी तिच्या घराशेजारी राहणार्‍या एका मुलीने तिला सांगितले की, घराशेजारी राहणारा एक मुलगा हा तुमच्या नातीला घरात नेऊन काहीतरी करत आहे. तेव्हा ती महिला त्या मुलाच्या घरी गेली.

तिने पाहिले असता त्या तरुणाच्या घराचे दार आतून बंद होते. तिने दाराच्या फटीतून पाहिले असता तो तरुण तिच्या नातीवर बलात्कार करत असल्याचे दिसून आले.

त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तेव्हा त्या तरुणाने दार उघडले व बालिकेला सोडून दिले. तिने बालिकेला विश्वासात घेऊन विचारले असता खाऊसाठी पैसे देतो, असे सांगून आकाशने तिला घरी बोलविल्याचे सांगितले. त्यानंतर घडलेला प्रकार महिलेने पाहिला होता.

याप्रकरणी महिलेने सदर बझार पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तरुणास अटक करून त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Back to top button