Doctor's Day Special
डॉक्टर्स डे विशेष Pudhari File Photo
कोल्हापूर

National Doctor's Day 2024: चाळिशीतच डॉक्टर मधुमेह, उच्च रक्तदाबाचे शिकार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आशेचा किरण बनून लोकांसाठी देवदूत ठरणार्‍या, रुग्णांच्या नसा न् नसा ओळखून प्रत्येक आजारांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनाच सध्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण चाळिशीतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे शिकार होत आहेत. वाढता ताण, जेवण आणि झोपेच्या अनियमित वेळा तसेच रुग्णसेवेमुळे पथ्य पाळण्यात येणार्‍या अडचणी या सर्व गोष्टींमुळे वयाच्या चाळिशीत डॉक्टरांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनीही रुग्णसेवा करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शैक्षणिक काळात सुरू होणार्‍या स्पर्धा या शेवटपर्यंत डॉक्टरांची पाठ सोडत नाही. या काळात लेखी परीक्षेचा ताण अधिक असतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षातील निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा ताण अधिक असतो. या काळात निवासी डॉक्टरांना 12 ते 14 तास काम करावे लागते. सध्या पेशंटची संख्याही वाढत असल्याने निवासी डॉक्टर 12 ते 14 तासांहून अधिक काळ काम करताना दिसतात. जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी या विभागात तर अन्य विभागांपेक्षा अधिक प्रमाणात काम करावे लागते, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

काही डॉक्टर स्वतःच्या फायद्यासाठी रुग्णांकडून लूटमार करत असल्याच्या घटना उघड होत असल्याने अनेकदा डॉक्टरांकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलला जातो. त्याच रुग्णांना वाचवताना रात्रीचाही दिवस करून वेळेला मात्र स्वतःसह कुटुंबाकडे लक्ष न देता रुग्णसेवा करणार्‍या डॉक्टरांना अजूनही नागरिकांकडून देवाची उपमा दिली जाते. हे डॉक्टर रुग्णसेवेदरम्यान स्वतःच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि चाळिशीत रक्तदाब आणि मधुमेहाचे शिकार होतात.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरताच

महानगरे तसेच काही शहरांमध्ये ज्ज्ज्ञ डॉक्टर आहेत. मात्र जिल्हास्तर, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. मुंबई तसेच शहर वगळता अजूनही ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नाहीत. राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर आहेत. ही संख्या तुलनेने फार कमी आहे.

डॉक्टरकी नको रे बाबा...

वडील डॉक्टर असणारी मुले सध्या त्यांच्या वडिलांचे काम पाहून वैद्यकीय क्षेत्रात न जाण्याचा निर्णय घेत आहेत. या क्षेत्रात असलेला ताण, कामाचे तास यामुळेच अन्य क्षेत्रात जाणे त्यांना पसंत असते, असे आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले.

सातत्याने कशामुळे तणाव

* शिक्षण पूर्ण झाल्यावर कामाचा ताण

* उद्दिष्ट साध्य होत नसल्यास येणारे नैराश्य

* शासकीय ठिकाणी नोकरी करणार्‍यांना बढती, बदल्यांवेळीचा त्रास

* वाढती रुग्णसेवा, अध्यापन, संशोधनाचा वेळ

* कामाच्या ठिकाणी असलेले प्रतिकूल वातावरण

* रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीचा धोका

* खासगी प्रॅक्टिस करणार्‍यांंना दवाखाना उभारतेवेळी येणार्‍या आर्थिक अडचणी

निद्रानाशाचा त्रास

झोप, ताण, निद्रानाश यांसारख्या तक्रारी डॉक्टरांना कमी वयात सुरू होतात; तर 40 वर्षांनंतर उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार सुरू होतात, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT