हातगाडी लावण्याच्या कारणावरून एकाचा खून File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : हातगाडी लावण्यावरून तरूणाचा खून

गणेश मिरवणुकीच्या धामधुमीतच आराम कॉर्नरजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : हातागाडी लावण्यावरून झालेल्या वादाच्या शुल्लक कारणावरून मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास इम्रान इम्मामुद्दीन मुजावर (वय ३९, रा. आराम कॉर्नर) या तरूणाचा खून झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधुम सुरू असताना गजबजलेल्या शिवाजी रोडवरील आराम कॉर्नरजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर संशयित युसूफ आलमजीत (दाजी) याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इम्रान मुजावर याचा आराम कॉर्नर येथे कटलरी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी इम्रानच्या स्टॉलशेजारीच पर्स विक्रीच्या स्टॉल लावण्यावरून वाद झाला होता. या वादाचा राग युसूफच्या मनात होता. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास युसूफने इम्रानला मोबाईलवरून कुठे आहे अशी विचारणा केली. यानंतर अवघ्या दोन-तीन मिनिटातच युसूफ आराम कॉर्नर येथे आला. इम्रानला बाजूला बोलावत त्याने मिठ्ठी मारत इम्रानवर चाकूचा वार केला. हा वार इम्रानच्या थेट छातीत हद्‌याजवळच केला. अचानक झालेल्या या हल्लाने इम्रानने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात युसूफने दुसरा केलेला वार डाव्या दंडावर झाला. तरीही इम्रानने युसूफशी झटापट केली.

इम्रान आणि युसूफ यांच्यात झटापट सुरू होताच, काही अंतरावर असलेले जावेद शेख आणि इम्रानच्या बहिणीचा पती सोहेल शब्बीर मुजावर धावत आले. दोघांनीही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मला छातीत मारले, असे सोहेलला सांगत इम्रान खाली कोसळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू होताच काही मिनिटात इम्रानचा मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी गर्दी झाली, नागरिकांनी संशयितांना पकडून ठेवले होते, त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

आराम कॉर्नरला खून झाल्याचे समजतात घटनास्थळी तसेच सीपीआरमध्ये जुना राजवाडा पोलिसांनी धाव घेतली. सीपीआरमध्येही इम्रानच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराची मोठी गर्दी झाली. यामुळे सीपीआरमध्येही बंदोबस्त वाढवण्यात आला. इम्रान अविवाहित होता, त्याला तीन बहिणी आणि वृध्द आई-वडील आहेत. सीपीआरमध्ये बहिणीचा केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT