

पनवेल : घरगुती वादाचा राग मनात धरून पोटच्या मुलीने आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी मुलीसह दोघा संशयितांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. प्रिया नाईक (वय ४४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पनवेल शहरातील मणीकनगर सोसायटीमध्ये प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. शुक्रवारी (दि.१३) प्रिया यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता प्रथमदर्शी प्रिया नाईक यांचा दोरी किंवा वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला. तपास करताना काही धागेदोरे हाती लागल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तसेच यामध्ये खून झालेल्या महिलेच्या मुलीचा देखील सहभाग असून घरगुती वादातून हा खून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलीलाही पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.