पिंपळनेर : मनोरुग्ण मुलाने पित्याच्या डोक्यात दगड घालून केला खून;गुन्हा दाखल
पिंपळनेर,जि.धुळे : कामधंदा करीत नाही अशी वारंवार विचारणा करीत असल्यामुळे मुलाला याचा राग येऊन पोटच्या पोराने जन्मदात्या बापाला शेतातील झोपडीतच टणक दगड डोक्यात घालून जागीच ठार केल्याची घटना खरगाव पोष्ट वार्सा गावात घडली.
बापू पांड्या कुवर (वय 47 वर्ष राहणार खरगाव पोस्ट वारसा) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. यातील आरोपी हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत यातील संशयित आरोपी विजय बापू कुंवर याच्या विरोधात पत्नीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवार (दि. 6) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारात खरगाव येथील शेतात बांधलेल्या झोपडीत घडली. पोलीस पाटील वंता रेख्या केवळ व मृताची पत्नी यांनी मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयताची पत्नी फुलाबाई बापू कुवर ही शेतातून काम आटोपून घरी परत येत असताना शेतातील घरातून मुलगा विजय हा हातात पिशवी घेऊन घाबरलेल्या अवस्थेत बाहेर निघताना दिसला. विजय हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याच्या कामाबाबत आई फुलाबाई व वडील बापू पांड्या कुवर हे वारंवार विचारणा करीत होते. या कारणावरून तो सतत त्यांच्याशी भांडण करीत होता. याचा त्याला राग आला व त्याने बापासोबत भांडण करून रागातूनच बापाच्या डोक्यात मोठा टणक दगड घालून बापू पांड्या कुवर (वय 47) यास जागीच ठार करून मुलगा विजय हा फरार झाला. अशी फिर्याद मयताची पत्नी फुलाबाई बापू कुवर हिने शनिवार (दि.7) रोजी दुपारी दोन वाजता येथील पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचाचा शोध घेतला जात आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे व पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी भेट दिली.

