खालापूर : पुढारी वृत्तसेवा
प्रियकरासोबत चाळे करीत असताना आईने पाहिल्यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे, अहिल्यानगर गावात घडली आहे. आईने आत्महत्या केल्याचा बनाव मुलगी आणि तिच्या प्रियकराने केला. मात्र, मृत आईच्या दुसऱ्या मुलीने तो बनाव उघड केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली आहे.
मृत महिलेचे नाव संगीता झोरे (वय ४२) असे आहे. १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली. त्यावेळी थोरली मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत चाळे करीत असताना त्यांनी पाहिले. यानंतर संगीता यांनी आरडाओरडा केला असता संतोष नांदगावकरने त्यांना खाली पाडले आणि घरातील ब्लॅकटने त्यांचे तोंड दाबले, तर भारती हिने त्यांचे पाय दाबले. यामुळे संगीता यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
संगीता यांच्या दुसऱ्या मुलीने हा प्रकार पाहिला होता. तिने पोलिस आणि नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर भारती आणि संतोष यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.