ऐनापूर, पुढारी वृत्तसेवा : ऐनापूरकरांनी विधवा प्रथा बंदीसह एक पाऊल पुढे टाकले आहे. यापूर्वी वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांना कुंकू, सोन्याचे मनीमंगळ सुत्र, हिरवी साडी, बांगड्या देवून सन्मान करत प्रथेला मूठमाती देण्याचे अनोखे काम केले आहे. राज्य शासनाच्या आवाहनानंतर ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीने मंगळवारी (३१ मे) झालेल्या ग्रामसभेत सभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यापुढे विधवा प्रथा बंदीचा ठराव तर केलाच अन् या ही पुढे जावून विधवा प्रथाबंदीसह ऐनापुरकरांनी एक पाऊल पुढे टाकत या पूर्वी वैधव्य झालेल्या महिला भगिनींना कुंकू, सुवर्ण अलंकार मणीमंगळ सूत्र, हिरवी साडी, बांगड्या देवून गावातील महिला वर्गाने आदरपूर्वक सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
याच्या अंमलबजावणीसाठी सर्व ग्रामस्थ व महिला वर्गाच्या उपस्थितीत गावातील महादेव मंदिरासमोर कार्यक्रम घेवून पुनम देसाई, रेश्मा मांग यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या प्रतिसादाला दाद देत धाडसी पाऊल टाकत या उपक्रमाला साथ दिली. या दोन रणरागिणींचा सोन्याचे मणीमंगळ सूत्र, हिरवी साडी, बांगड्या देवून गावातील महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुनम देसाई यांनी आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर स्वतःवर आलेले प्रसंग सांगताना ग्रामसभेतील सर्वांचेच डोळे पाणावले. तसेच विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केले बद्दल त्यांनी हात जोडत पाणावलेल्या डोळ्यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, अॅड. सुरेशराव कुराडे, सरपंच ईश्वर देसाई, माजी सरपंच अॅड. दिग्विजय कुराडे, टी. एस. देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास देसाई, महमद मकानदार, छापिलाल माकांदर, रामचंद्र दाद्दिकर, ग्रा. प सदस्य, ग्रामसेवक सोनाली पाटील, तलाठी सुनीता काटे, व ग्रामस्थ उपस्थित होते.