भाजप देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्ष; गेल्या आर्थिक वर्षात ४७७ कोटींची देणगी | पुढारी

भाजप देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्ष; गेल्या आर्थिक वर्षात ४७७ कोटींची देणगी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वाधिक ४७७ कोटी रुपयांची देणगी मिळाली. तर, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ७४.५० कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली. आकडेवारीवरून केंद्रासह देशातील जवळपास २० राज्यांमध्ये सत्तेवर असलेली भाजप देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीसंबंधी नुकताच एक अहवाल सार्वजनिक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

काँग्रेसला ७४ कोटी, तर राष्‍ट्रवादीला २६ कोटी रुपयांच्या देणग्या

अहवालानूसार भाजपला विविध शाखा, निवडणूक ट्रस्ट तसेच व्यक्‍तींकडून ४७७ कोटी ५४ लाख ५० हजार ७७ रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या. भाजपने २०२०-२१ मध्ये मिळालेल्या देणग्यांसंबंधीचा अहवाल १४ मार्च २०२१ रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. तर, काँग्रेसला ७४ कोटी ५० लाख ४९ हजार ७३१ कोटींच्या देणग्या मिळाल्या. निवडणूक कायद्याच्या तरतूदींनूसार राजकीय पक्षांना २० हजार रुपयांहून अधिकच्या देणग्यांसंबंधीची माहिती देणे बंधनकारक आहे.

भाजप, काँग्रेस व्यतिरिक्त बंगालमधील सत्ताधारी तृणमुल काँग्रेसला (टीएमसी) २६ देणगीदारांकडून ४२.५१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ७९ देणगीदारांकडून २६.२६ कोटी रूपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या. तर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीला (मार्क्सवादी) २६६ देणगीदारांकडून १२.८५ कोटींच्या देणग्या मिळाल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे.

हे ही वाचलंत का?  

Back to top button