कोल्हापूर

Swabhimani Shetkari Sanghatana protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन तीव्र; जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वाभिमानी’चा चक्काजाम

अविनाश सुतार

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षीच्या उसाला ४०० रूपये आणि यावर्षीच्या उसाला पहिला हप्ता ३५०० रूपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि.१९) ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. बिद्री (ता. कागल) येथील गारगोटी-कोल्हापूर मुख्य राज्यमार्गावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. Swabhimani Shetkari Sanghatana protest

या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मुरगुड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी स्वाभिमानीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, बाळासाहेब, मनोज फराकटे, नंदकुमार पाटील, बालाजी फराकटे, बाळासो पाटील, डॉ. विनायक जगदाळे, संजय फराकटे, संग्राम साठे, विष्णू मगदूम, रोहित जाधव, श्रीनाथ साठे, धोंडीराम रामाणे, मोहन साठे, पांडूरंग साठे, पांडूरंग जांभळे, आनंदी पाटील, अंजना पाटील, विकास पाटील, बाजीराव पाटील, यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Swabhimani Shetkari Sanghatana protest

Swabhimani Shetkari Sanghatana protest मुदाळतिट्टा येथे चक्का जाम 

मुदाळतिट्टा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राधानगरी, भुदरगड, कागल ,करवीर तालुक्यातील संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. यामुळे चारही महत्वाच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

या आंदोलनात अजित पोवार, पांडुरंग जरग, बाळासाहेब पाटील, तुकाराम गुरव, निवृत्ती देसाई, धनाजी गुरव, बबन यादव, अशोक पाटील, जयसिंग सावेकर, सातापा पाटील, विनायक जगदाळे, इंद्रजीत भारमल, जयवंत पाटील यांच्यासह राधानगरी, भुदरगड, कागल ,करवीर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

धामोड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे चक्काजाम आंदोलन

धामोड: पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी धामोड व परिसातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आपला संताप व्यक्त केला. वाहतूक ठप्प झाली होती.

या आंदोलनात रामचंद्र कुरणे, महादेव पाटील, रामभाऊ नलवडे, एकनाथ तेली, वसंत पाटील, विनय कोरे आदींसह धामोड, चांदे, कोते, लाडवाडी, कुरणेवाडी, केळोशी येथील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

बांबवडेत स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन 

१२ आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई;

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा :

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे स्वाभिमानीच्या वतीने कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सुमारे तासभर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. ऊसदराची घोषणा करा मगच कारखाने सुरू करा.., शेतकऱ्यांची लूट आता बस्स झाली.., शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि कारखानदारांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. याचवेळी छ. शिवाजी महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी खा. राजू शेट्टी यांचा जयघोष करीत आंदोलकांनी महामार्गावर ठाण मांडून रस्ता रोखून धरला होता. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखानदार धमकावत असल्याचा आरोप करणाऱ्या आंदोलकांनी अशा धमक्यांना स्वाभिमानीचे शिलेदार भीक घालणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

दरम्यान, तासाभरानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, एपीएस अमित पाटील यांनी आंदोलन थांबविण्याची विनंती केली. परंतु आंदोलन कायम ठेवण्याचा आंदोलकांचा इरादा पोलीस बाळापुढे अपुरा पडला. पोलिसांनी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, पद्मसिंह पाटील, रायसिंग पाटील, भैय्या थोरात, राम लाड, अमर पाटील, मनीष तडावळेकर, शामराव सोमोशी, शिवाजी पाटील, अनिल पाटील आदी स्वाभिमानाच्या प्रमुख १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनस्थळी तैनात पोलीस व्हॅनमधून शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे नेण्यात केले. यानंतर दिगंबर चिले, बाबासो किटे, उत्तम भुरुगडे यांच्यासह बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळित केली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून उशिरा त्यांची मुक्तता केल्याचे पो. नि. सावंत्रे यांनी सांगितले.

मलकापूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात चक्का जाम आंदोलन 

मलकापूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी कृती समितीचे भाई भारत पाटील, भाई राजाराम मगदूम, राजू देशमाने, शंकरराव चौगले, नामदेव पाटील, बापू कांबळे, गोपाळ पाटील, अनिल कांबळे, स्वाभिमानीचे वसंत पाटील, राजू केसरे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले

सरवडे येथे  चक्काजाम आंदोलन

सरवडे : पुढारी वृत्तसेवा : सरवडे येथे परिसरातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला. येथील मुख्य रस्त्यावर टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करत काही काळ वाहतूक रोखून धरली. यावेळी स्वाभिमानीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, पांडुरंग जरग, उदय मोरे, विठ्ठल पाटील आदीसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळे येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन

कळे : पुढारी वृत्तसेवा : कळे (ता.पन्हाळा) येथील दस्तुरी चौकात शरद जोशी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

शरद जोशी शेतकरी संघटनेचे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक जाधव यांनी संघटनेच्या मागणीनुसार गेल्यावर्षी व यावर्षी साखर कारखान्यांनी दर न दिल्यास साखर कारखाने बंद करण्याची मागणी केली. बाजीराव देवाळकर यांनी ऊसतोड बंद करण्याचे आवाहन केले.

आंदोलनामुळे कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी कळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवून आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अशोक जाधव, बाजीराव देवाळकर, बबन खाटांगळेकर, भिवाजी खाडे, बबन कुंभार यांच्यासह परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT