कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा: देशाच्या सीमेचे संरक्षण करत जवानांनी बलिदान दिले आहे. ते सीमेवर संरक्षण करतात म्हणूनच आपण देशात सुरक्षित आहोत. मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य 75 हजार वृक्षांची रोपवाटिका निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले.
'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' अभियान यात्रेच्या समारोप प्रसंगी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव अॅड. सुशांत पाटील, महामंत्री सुदर्शन पाटसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश सचिव अॅड. पाटील म्हणाले की, वीर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर 75 हजार वृक्षरुपी भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकासाठी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधी स्थळावरून पवित्र माती जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
खिद्रापूर, सैनिक टाकळी, राजापूर, अकिवाट, नृसिंहवाडी येथून आणलेली माती अमृत कलशात एकत्रीकरण करण्यात आली. अमृत कलशचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.
यावेळी निवृत्त सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र देसाई, विद्यासागर सौंदते, शिवाजी चव्हाण, योगेश माळी, रवींद्र मोगणे, अण्णासाहेब गायकवाड, सुधीर सरंजामे, दरीगोंडा पाटील, रामचंद्र बत्ते, अशोक पाटील, आनंदा बंडगर आदी उपस्थित होते. डॉ. अरविंद माने यांनी आभार मानले.
हेही वाचा