कोल्हापूर

Panchganga river flood : शिरढोण पूलावर पाणी; इचलकरंजी–टाकवडे मार्ग बंद

जलपर्णी तुंबल्याने नदीकाठच्या शेतीला धोका

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पाणलोट क्षेत्रासह धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत बुधवारी आणखी वाढ होऊन ती ५३ फुटांवर पोहोचली. परिणामी, शिरढोण पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी–टाकवडे–शिरढोण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

यापूर्वी वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीतील मोठ्या प्रमाणावरील जलपर्णी (केंदाळ) कुरुंदवाड हद्दीतील मळी परिसरातील शेतांमध्ये येऊन विसावली होती. गेल्या सहा दिवसांत ही जलपर्णी अधिक दाट होऊन पुलाला तुंबली आहे. नदीतील प्रवाह आणखी वाढल्यानंतर ही जलपर्णी पुन्हा प्रवाहित झाल्यास नदीकाठच्या शेतीचे संभाव्य नुकसान टळणार आहे.

दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा, कुरुंदवाड येथील अनवडी नदी बंधारा आणि राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत. आता शिरढोण पूलही पाण्याखाली गेले आहेत.

शिरढोण पूल हा इचलकरंजी, टाकवडे, शिरढोणमार्गे कोल्हापूरकडे जाणारा महत्त्वाचा व जवळचा मार्ग असल्याने पुलावरील वाहतूक बंद झाल्याचा फटका दैनंदिन प्रवासी, शेतकरी आणि व्यावसायिकांना बसत आहे. तसेच शिरढोण–टाकवडे परिसरातील शेतीकडे जाण्याचा संपर्कही तुटल्याने शेतकऱ्यांना शेतात पोहोचणे कठीण झाले आहे.प्रशासनाने नागरिकांना पुलावर पाणी आल्याने पुलावरून किंवा बंद करण्यात आलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT