Sangli Rain update : शिराळ्यात गळ्याला पाणी; आटपाडीच्या डोळ्यात पाणी

• वारणेला पूर • चांदोली धरण ४७, कोयना ३४ टक्क्यांवर • वारणा धरणात एका दिवसात १.६३ टीएमसी वाढ
Sangli Rain update
शिराळ्यात गळ्याला पाणी; आटपाडीच्या डोळ्यात पाणी
Published on
Updated on

सांगली : सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली (वारणा) व कोयना धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून चांदोली धरण ४७.१५ टक्के, तर कोयना धरण ३३.९२ टक्के भरले आहे. वारणा धरणात अवघ्या एका दिवसात १.६३ टीएमसी पाण्याची भर पडली असून दोन्ही धरणांतून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

चांदोली परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा तसेच खटाव–नांद्रे पूल, म्हैसाळ-कनवाड पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वारणा नदीला पूर आला असून ऐतवडे खुर्द येथील साकव पुलावर पाणी आल्याने सांगली–कोल्हापूर जिल्ह्यांतील संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्याच्या पूर्व भागातील आटपाडी तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप पेरण्या रखडल्या असून माणगंगा नदीसह जलस्रोत कोरडेच आहेत. वांगी येथे पावसामुळे धोकादायक दगडी भिंत कोसळली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली.

सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली (वारणा) आणि कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणात एका दिवसात १.६३ टीएमसी पाण्याची भर पडून साठा १६.२२ टीएमसी (४७.१५ टक्के) झाला आहे. तर कोयना धरणात एकूण पाणीसाठा ३५.७० टीएमसी (३३.९२ टक्के) झाला आहे. दोन्ही धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असली तरी अद्याप कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. सह्याद्रीत पावसाचा जोर कायम राहिल्यास चांदोली आणि कोयना धरणांतील पाणीसाठ्यात पुढील काही दिवसांत आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

म्हैसाळ बंधारा पाण्याखाली; शिरोळशी संपर्क तुटला

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला असून, सीमाभागातील वाहतूक व संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने कर्नाटक राज्यातील तसेच मिरज तालुक्यातील काही गावांचा शिरोळ तालुक्याशी असलेला थेट संपर्क तुटला आहे. परिणामी म्हैसाळ–कनवाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, नागरिकांना मिरजमार्गे पर्यायी प्रवास करावा लागत आहे. सध्या बंधाऱ्यावर सुमारे तीन फूट पाणी आहे. नदीकाठच्या शेतीत पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वारणा-मोरणा धोक्याच्या पातळीवर

शिराळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व मोरणा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या भागात पुराचा धोका वाढला आहे. वारणा नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कोकरूड - रेठरे आणि मांगले -सावर्डे मार्गावरील रस्ते व पुलांचे नुकसान झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये शिरल्याने अनेक शेतांतील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे खरीप पेरणीची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत. मोरणा धरणातील पाणीसाठा अवघ्या काही दिवसांत १८ टक्क्यांवरून ६५.८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास तालुक्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

आटपाडीत पावसाची प्रतीक्षा; खरीप पेरण्या रखडल्या

आटपाडी : जुलै महिना सुरू होऊनही आटपाडी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. १ ते ६ जुलै दरम्यान दिघंची मंडलात ४.६ मि.मी., खरसुंडी मंडलात २५.१ मि.मी., तर आटपाडी मंडलात १२.७ मि.मी. पाऊस झाला. पेरण्या रखडल्या असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

आटपाडीची जीवनवाहिनी असलेली माणगंगा नदी अद्याप कोरडी असून नदी-नाले, ओढे, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे. ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही चिंता वाढली आहे. यंदा दुष्काळी पट्ट्यात पुन्हा दुष्काळाची चाहूल लागली आहे. पेरणीसाठी तयार ठेवलेले बियाणे, खते आणि मशागतीवरील खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news