सदाभाऊ खोत Pudhari File Photo
कोल्हापूर

सदाभाऊंच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला आव्हान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना आपल्या कोट्यातून विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन भाजपने राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेसमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न केला आहे. सलग दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर आता ऊसपट्ट्यातील मते कॅश करण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे. आता ती यशस्वी होणार का, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना मूळ शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या फुटीतून झाली. शरद जोशी यांनी तंबाखू, कांदा, ऊस या पिकांच्या दराबाबतचे आंदोलन छेडले. त्यामध्ये राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, लक्ष्मण वडले हे सारे त्या चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. नंतर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. सदाभाऊ खोत व लक्ष्मण वडले हे त्यांच्यासमवेत नंतर सहभागी झाले. शेट्टी, वडले, खोत यांनी आक्रमक भाषणांनी संघटना वाढविली. गावागावांत संघटनेचे बोर्ड लागले. ऊस दराच्या प्रश्नावरून संघटनेने आक्रमक भूमिका घेतली, शेतकर्‍यांना दर वाढवून मिळाला. त्यानंतर दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात आले, त्याचाही परिणाम जाणवला. पहिल्यांदा स्वाभिमानीच्या ताकदीवर खासदार झालेल्या राजू शेट्टी यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपचा आधार घेतला. नरेंद्र मोदी हे शेट्टी यांच्या प्रचारासाठी आले होते.

मंत्रालयातील दालनातून शेट्टी यांचा फोटो हटविला

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वाभिमानीच्या वाट्याला आलेली विधान परिषदेची जागा सदाभाऊ खोत यांना देण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या वाट्याला आलेले राज्यमंत्रिपदही खोत यांना देण्यात आले. खोत यांच्या मंत्रालयातील दालनात राजू शेट्टी यांचा फोटो झळकला. मात्र, त्यांच्यात काही कारणांनी अंतर पडले आणि अचानक एक दिवस मंत्रालयातील खोत यांच्या दालनातील शेट्टी यांचा फोटो हटविण्यात आला. त्यांच्या वाटाही वेगळ्या झाल्या.

एकटे पडल्याची खोत यांची खंत

2019 ची निवडणूक शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून लढविली. त्यावेळी भाजपच्या प्रचारासाठी खोत यांनी शेट्टी यांच्याविरोधात रात्रीचा दिवस केला. शेट्टी यांच्यावर आरोपांची राळ उडविली, शेट्टी यांची आंदोलने मॅनेज असल्याचा आरोप केला. शेट्टी पराभूत झाले. पुढे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. खोत यांचे राज्यमंत्रिपद गेले, पुढे आमदारकीही गेली. सत्ता जाताच सगळे गेले, येणारे फोन बंद झाले आणि मी एकटाच पडलो, अशी खंत खोत यांनी व्यक्त केली. आमदारकीची मुदत संपल्यावर आपला विचार होत नसल्याबद्दलही खोत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

विधानसभेचा निकाल ठरविणार जोडणीचे यश

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला आहे, त्याचा वचपा आता त्यांना विधानसभा निवडणुकीत काढायचा आहे. त्यासाठी ज्या काही राजकीय जोडण्या कराव्या लागतात, त्याचाच एक भाग म्हणून ऊसपट्ट्यात सदाभाऊ खोत यांना विधानसभेचे मैदान मारण्यासाठी भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा कितपत उपयोग होणार, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

‘स्वाभिमानी’विरुद्ध आघाडी उघडावी लागणार

आता सत्तेचे पद खोत यांना देण्याचे भाजपने ठरविले आहे. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे तण नष्ट करण्याची घोषणा 2019 मध्ये शेट्टी यांनी केली होती; तर ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून खोत पुढे आले त्या संघटनेचे अस्तित्व संपविण्यासाठी त्यांना ताकदीने राजकीय आखाड्यात उतरावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT