सरुड : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या १० दिवसांपासून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेट्टींच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने 'स्वाभिमानी' चे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत चक्काजाम आंदोलन केले. रत्नागिरी–कोल्हापूर महामार्ग बांबवडे आणि मलकापूर येथे शुक्रवारी (दि. ४) रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी अडवून धरला. यावेळी राजू शेट्टींच्या धरणे आंदोलनावर तात्काळ मार्ग काढा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा आंदोलकांकडून सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
राजू शेट्टीच्या आंदोलनावर जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. रात्री अपरात्रीच्या वेळी शेतात काम करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना जंगली जनावरे, साप, विंचू, काट्याकुट्यांचा सामना करावा लागतो.
यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग घडतात, यासाठी दिवसा वीज द्या ही 'स्वाभिमानी'ची रास्त मागणी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखलच घेणार नसेल तर याहीपेक्षा मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा स्वाभिमानीच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान शाहूवाडी पोलिसांनी बांबवडेत राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या 'स्वाभिमानी' च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, युवाध्यक्ष पद्मसिंह पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष अवधूत जानकर, गुरुनाथ शिंदे, शामराव पाटील, आर. पाटील, चंद्रकांत पाटील, भैय्या थोरात, अमर पाटील, अनिल पाटील आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
हेही वाचलंत का?