किणी; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता धोरणात्मक निर्णय घ्यायला केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी मी लोकसभा लढवत आहे. मला पदाची किंवा सत्तेची हाव असती तर मी पर्मनंट केंद्रीय मंत्री असतो. आता आघाडी न करता स्वतंत्रपणे खासदारकी लढविण्यावर ठाम असल्याचे माजी खा.राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पेठवडगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमदारकीपेक्षा खासदारकीत धोरणात्मक निर्णय घेण्यास वाव असतो. माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतमालाला हमीभाव देण्याच्या कायद्याचा मसुदा, एफआरपी, आणि इथेनॉलचे धोरण तयार करून दिल्यानेच ते राबविणे केंद्र शासनाला भाग पडले. आमदार असताना २००७ ला ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ स्थापन करण्याबाबतचे खाजगी विधेयक सभागृहात मांडल्यामुळेच ते स्थापन झाले. आता वस्त्रोद्योग आणि शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी आग्रही असणार आहे, असे शेट्टी म्हणाले.
गेल्या वेळी झालेल्या पराभवाबाबत बोलताना शेट्टी यांनी मी महाविकास आघाडीत का गेलो हे जनतेला पटवून देण्यात मी व कार्यकर्ते कमी पडलो. त्यामुळे पराभव झाला असे ते म्हणाले. तसेच पंचगंगा, कॄष्णा व वारणा नदीकाठावर सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत रायचूर विद्यापीठाने संशोधन केले आहे. निव्वळ हवेतून नाही तर आता जमिनीतून मुळावाटे पिकांमध्ये विष पसरत आहे. यासाठी नदीचे प्रदूषण थांबविण्याची गरज आहे. मात्र याबाबत कुठेच ठोस कृती होताना दिसत नाही. सध्याचे खासदार याबाबत फक्त घोषणाच करतात पण कृती मात्र नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही पंतप्रधान मी जवळून अनुभवले आहेत. दोघेही मला चांगले ओळखतात, मात्र कोणताही प्रश्नावर अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याबाबतीत मनमोहनसिंग जास्त चांगले होते. मोदींचे काम मात्र सब कुछ मुझेच मालूम है, मगर मै कुछ नही करुंगा, असे असल्याची टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
हेही वाचा :