मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा सरकारचा योजनाबध्द कट, ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप | पुढारी

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा सरकारचा योजनाबध्द कट, 'या' नेत्याचा गंभीर आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सरकार सांगेल त्या प्रमाणे वागत नसल्याने सरकारने त्यांना बदनाम करण्याचा कट रचला आहे असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. प्रामाणिकपणे व निःस्वार्थपणे आंदोलन करीत असेल अशा नेत्यासोबत प्रत्येक आंदोलकाने राहिलेच पाहिजे अशी आपली धारणा आहे, असेही मत गोटे यांनी व्यक्त केले.

जरांगे पाटील यांच्या संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. मनोज जरांगे पाटील अॅडजस्ट होणार नाही, हे लक्षात आल्यामुळेच मराठा आंदोलनाच्या विरोधी असलेल्या सुर्याजी पिसाळ तसेच मंथरेला अॅडजस्ट करुन बाहेर काढले. जरांगे पाटलांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढल्यानेच राज्य सरकारला एक दिवसाचे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागला. मनोज जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनाला बदनाम करण्यातकरीता ओ.बी.सी.च्या नेत्यांकडून जरांगे पाटलाला मजबूत दुषणे देवून झाली. पण जरांगे पाटील तूसभरही मागे न हटल्यामुळे अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्याला दोन-दोन, तीन-तीन वेळा त्यांना शरण जावे लागले. जितकी वेळ मारुन नेता येईल, तेवढी मारुन नेली. पण जरांगे ऐकतच नाही, याची खात्री होताच पाळीव विरोधक बाहेर काढून जरांगे पाटलासारख्या त्यागी, प्रामाणिक व निःस्वार्थी व्यक्तिवर शिंतोडे उडवायला कमी केले नाही. अशी टीका गोटे यांनी केली आहे.

मी तर प्रारंभापासूनच सांगत होतो की, हे सरकार जरांगे पाटलांना खोट्या आरोपामध्ये गुंतवून मराठा आंदोलन बदनाम करतील. माझी सर्व मराठा आंदोलकांना कळकळीची विनंती आहे की, अशा कुठल्याही अपप्रचाराला मेहरबानी करुन बळी पडू नका. पुन्हा अशी संधी चालून येणे नाही. राज्यकर्त्यांना थोडीतरी लाज वाटली पाहिजे की, ज्या नेत्याने आपली दोन एकर जमिन विकून येवढे मोठे आंदोलन उभे केले अशा माणसाच्या चारित्र्यावर संशय घेणे हे शोभा देणारे नाही. जरांगे पाटील यांची पत्नी दोनशे रुपये रोजाने अंतरावली गावामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये निंदणी, खुरपणीच्या कामासाठी जाते. त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर व चारित्र्यावर संशय घेणे ही अमानुषता आहे. अर्थात, जरांगे पाटलांना जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले असल्यामुळे या विकावू राजकारण्यांच्या अपप्रचाराला कुणी बळी पडेल याची सुतराम शक्यता नाही. जी जी व्यक्ती प्रामाणिकपणे व निःस्वार्थपणे आंदोलन करीत असेल अशा नेत्याच्या आंदोलनासमवेत प्रत्येक आंदोलकाने राहिलेच पाहिजे अशी आपली धारणा आहे. असेही माजी आमदार अनिल गोटे यांनी आज म्हटले.

नवा पायंडा पडला आहे

आजच्या राजकारणाने खालची अंतिम पातळी गाठली आहे. आपल्याला आपण शहाणा ही सरळ विरोधी पक्षावर ढकलायचे, याच्या नावाने खडे फोडायचे हा एक सोपा मार्ग राज्यकर्त्याने स्विकारले आहे. केंद्रातील सरकार असेल तर, पंडित जवाहरलाल नेहरुवर ताशेरे ओढायचे मागच्या सरकारने केले म्हणून नामनिराळे व्हायचे. राज्यातील सरकारने त्याचीच नक्कल करणे सुरु केले आहे. असा नवा पायंडा पडला आहे. असे गोटे यांनी शेवटी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button