

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सहमती होण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होण्याची शक्यता मर्यादीत स्वरुपाची असल्याचे कॉंग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांची तृणमूल कॉंग्रेसबद्दलची प्रतिकूल भूमिका यामध्ये महत्त्वाची असून डाव्या आघाडीसोबत मत्री होण्याची शक्यता अधिक असल्याचेही कॉंग्रेसमधून सांगितले जात आहे.
इंडिया आघाडीमध्ये कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये झालेल्या जागा वाटपाच्या सहमतीनंतर तृणमूल कॉंग्रेससोबतही आघाडी लवकर होणार असे संकेत कॉंग्रेसमधून देण्यात येत होते. तृणमूल कॉंग्रेसने एकला चलो रे ची भूमिका लावून धरली असली तरी कॉंग्रेसमधून मात्र आशावादी सूर लावण्यात येत होता. असे असताना आता दोन्ही पक्षांची आघाडीची शक्यता कमी असल्याचे कॉंग्रेसमधूनच आज सांगण्यात आले. दोन्ही पक्षांच्या जागा वाटपात तोडगा शोधण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांची भूमिका अडथळा ठरत असल्याचे कॉंग्रेस सुत्रांनी सांगितले.
लोकसभेतील गटनेते असलेले प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा तृणमूल कॉंग्रेससोबत आघाडीला ठाम विरोध असून ते सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्ला करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये कॉग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांच्या आघाडीसोबत जावे, असा त्यांचा आग्रह आहे.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये असताना राज्यातील ४२ जागांपैकी एकही जागा काँग्रेससाठी सोडणार नसल्याचे तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जींनी स्पष्ट केल्यानंतर, कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांकडून नऊ जागांची मागणी सुरू होती. अंतिमतः ही तडजोड सहा जागांवर होऊ शकते, असेही संकेत देण्यात आले होते. परंतु दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी एक इंचही पुढे सरकू शकलेल्या नाहीत, अशी सूचक टिप्पणी या सुत्रांनी केली. त्याचा संदर्भ देत कॉंग्रेसच्या अन्य एका वरिष्ठ नेत्याने, सध्या तृणमूल कॉंग्रेसच्या तुलनेत डाव्या आघाडीशी कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्यता जास्त आहे, असा दावा केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची डाव्या आघाडीसोबत आघाडी होती. परंतु, विधानसभेत दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नाही. राज्यात काँग्रेस आणि डावे या दोन्ही पक्षांची घसरण झाली आहे.