कोल्हापूर : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. यामुळे नद्यांवरील बंधारे पाण्याखाली जात आहेत. रविवारी सांयकाळी पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 85 वर गेली. या बंधार्यांवरून होणारी वाहतूक बंद आहे. काही ठिकाणी नद्यांचे, ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आले. यामुळे जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. या गावांत पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील धरणे सरासरी 70 टक्के भरली असून, धरणांत 65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, तर भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे बंधारे पाण्याखाली गेले. बीड आणि आरे बंधारेही पाण्याखाली गेल्याने करवीर व पन्हाळा तालुक्यांतील अनेक गावांचा एकमेकांशी थेट संपर्क तुटला आहे. वेदगंगा नदीवरील म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले असून, मुरगूड-निपाणी राज्यमार्गावर पाणी आले आहे. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकूड व बाचणी बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठावरील गावांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे भुदरगड, कागल व शिरोळ तालुक्यांतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी बंधार्यांवर पाणी आले आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा नदीवरील हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकूर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी बंधार्यांवरून चंदगड, गडहिंग्लज तालुक्यांतील अनेक गावांचा थेट संपर्क बंद झाला. शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यांतही नद्यांची पातळी वाढत आहे. कडवी नदीवरील भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरूड पाटणे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव या बंधार्यांवर पाणी आले आहे. शाळी, कुंभी, कासारीसह धामणी नदीवरील सुळे, पनोरे व आंबर्डे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.