गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने २७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड गावात पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठ जलमय झाली आहे. तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाने सुरु केले आहे.
भामरागडमध्ये १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ मोठी जनावरे, ६ शेळ्यांचा मृत्यू झाला. शिवाय ७५ घरे आणि ६ गोठ्यांची पडझड झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सिरोंचा, भामरागड व गडचिरोली या तालुकास्थळी एसडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली, अहेरी-मोयाबीनपेठा, आलापल्ली-सिरोंचा, जारावंडी ते पाखांजूर,पोर्ला-वडधा, वैरागड-शंकरपूर-चोप, कुरखेडा-वैरागड, कारवाफा-पोटेगाव, गोठणगाव-सोनसरी, देसाईगंज-नवरगाव-आंधळी, लखमापूर बोरी-गणपूर, रामगड-सोनसरी-उरांडी,भेंडाळा-अनखोडा, चामोर्शी-मूल, चांदेश्वर टोला रस्ता,फोकुर्डी-मार्कंडादेव, देसाईगंज-नैनपूर-विठ्ठलगाव,चिखली-धमदीटोला, गोठणगाव-चांदगाव, आरमोरी-रामाळा, वैरागड-कढोली,पेंढरी-ढोरगट्टा,भाडभिडी-रेगडी-देवदा,कोनसरी-जामगड,सारखेडा-भापडा इत्यादी २७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून, तेथून २ लाख १३ हजार ७९० क्युसेक्स, तर चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजमधून २ लाख ९३ हजार ११५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा बॅरेजमधून ३ लाख ७३ हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट दिला असून, काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सिक्चे संकेत दिले आहेत.
गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव नजीकच्या कुंभी नाल्याच्या काठावर काही शेतकरी अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बोटीच्या साहयाने त्यांनी सुटका केली. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कुंभी गावासह आरमोरी, देसाईगंज आणि कुरखेडा तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.