कोल्हापूर : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मुंबई येथे भारतीय प्रतिभेचे कौतुक करताना कोल्हापूरचा उल्लेख केला. जगातील सर्वात मोठ्या लक्झरी फॅशन ब्रँडस्पैकी एक असलेल्या शनेलच्या ग्लोबल सीईओ लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या असल्याचे सांगत मॅक्रॉन यांनी त्यांच्या भाषणात भारतीयांचा जगभर डंका सुरू असून, अनेक ग्लोबल ब्रँडचे सीईओ भारतीयच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
लीना नायर यांचा जन्म 1969 मध्ये कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्या त्यांच्या कुटुंबात उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी एक्सएलआरआयमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण करत सुवर्णपदकही पटकावले. 1992 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झालेल्या लीना यांनी पुढे 30 वर्षे या कंपनीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि आशियाई चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर बनल्या. 2021 मध्ये त्यांची शनेलच्या ग्लोबल सीईओ पदी निवड झाली.
आज जागतिक व्यवसायात भारतीय महिलांचे नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि बलाढ्य कंपन्यांची सूत्रे भारतीयांच्या हाती आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
‘शनेल’ ही फ्रान्समधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लक्झरी फॅशन कंपनी आहे. जिची स्थापना 1910 मध्ये गॅब्रिएल कोको शनेल यांनी पॅरिसमध्ये केली होती. हा ब्रँड उच्च दर्जाचे कपडे, रेडी-टू-वेअर कपडे, लक्झरी बॅग्ज, परफ्युम्स आणि दागिने यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. फॅशनच्या जगात शनेलचे स्थान अढळ असून, या ब्रँडच्या उत्पादनांना स्टेटस सिम्बॉल मानले जाते. शनेल नंबर 5 हा त्यांचा परफ्युम जगातील सर्वात प्रसिद्ध परफ्युमपैकी एक आहे.
शनेलचे प्रोडक्टस हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून ते अतिश्रीमंत वर्गासाठी बनवले जातात. त्यांच्या एका साध्या हँडबॅगची किंमत काही लाखांपासून सुरू होऊन कोटींपर्यंत जाते. शनेलचे परफ्युम्स, लिपस्टिक्स आणि सौंदर्य प्रसाधने लाखो रुपयांना मिळतात.