kolhapur Zilla Parishad 
कोल्हापूर

Kolhapur Zilla Parishad: कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्वासाठी भाजपची आक्रमक चाल

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा; महापालिकांनंतर ‘मिनी मंत्रालय’ची सूत्रे हाती घेण्याची रणनीती

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच कार्यकर्ते असणाऱ्या भाजपने जिल्ह्यात आता चांगले बस्तान बसविले आहे. एकेकाळी कार्यकर्त्यांचा शोध ज्यांना घ्यावा लागत होता त्यांच्या दारात उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली हे पक्षाचे यश आहे. तीन आमदार, एक राज्यसभा खासदार या राजकीय पाठबळाच्या जोरावर भाजपने कोल्हापूर महापालिकेत घवघवीत यश मिळविले. महापौरपदही मिळविले. जिल्हा परिषदेतील यशानंतर त्यांनी अध्यक्षपदावरही दावा करून आगामी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

मोजक्याच पण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा पक्ष जिवंत ठेवला. कोणाच्या तरी घरात आणि वाड्यातील खोलीत प्रपंच मांडलेले या पक्षाचे नेत्रदीपक असे कार्यालय झाले. इथपर्यंतची मजल चांगली झाली आहे. कोल्हापूरचे महापौरपद पटकावून आणि महापालिकेत चांगल्या जागा मिळवून भाजपने आगेकूच कायम राखली आहे. त्याचवेळी इचलकरंजी महापालिकेत घवघवीत असे यश मिळवून तेथेही पहिल्याच महापौरपदावर भाजपने आपले नाव कोरले आहे.

भाजपला मोठ्या यशाची अपेक्षा

भाजपला आता अजून मोठ्या यशाची अपेक्षा आहे. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हवे आहे. खरं तर कोल्हापूर आणि इचलकरंजीचे महापौरपद हे संख्याबळाच्या आधारे निश्चित झाले आहे. ज्याची संख्या जास्त त्याचा महापौर या सूत्रानुसार महापौरपद भाजपला मिळाले आणि ते योग्यच होते.

कमी संख्या बळावरही भाजपचा अध्यक्षपदाचा दावा

जिल्हा परिषद मात्र राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 12 व जनुसराज्यला 6 जागा मिळाल्या आहेत. ज्या संख्याबळाच्या जोरावर कोल्हापूर आणि इचलकरंजीचे महापौरपद भाजपला मिळाले त्याच नैसर्गिक न्यायाने जिल्हा परिषद अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवे. तसा दावा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला.

भाजपची आक्रमक रणनीती

या दाव्यामागे भाजपची आक्रमक अशी रणनीती आहे. ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून विकासाची गती गाठायची असा संकल्प करून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नारळ फोडला. आता कोल्हापूर आणि इचलकरंजीचे महापौरपद भाजपकडे आले आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ आहे. या साडेतीन वर्षांच्या काळात भाजप विकासाची गाडी कशी पळविणार आणि पिण्याच्या पाण्यापासून ते कचऱ्याच्या उठावापर्यंत अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे असलेले प्रश्न कसे सोडविणार ते दिसेलच. याचवेळी महापालिकांचा आर्थिक गाडा जो लडखडत चालत आहे त्याला गती कशी देणार तेही दिसेलच.

कुबड्या फेकून देणार?

मात्र दोन्ही महापौरपदापाठोपाठ अध्यक्षपदाच्या मागणीबाबत भाजपचे सुनियोजित असे राजकारण आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळाची तयारी करावयाची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना भाजपला आता कुबड्या फेकून द्यायची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले होते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मदतीने चालत असलेल्या भाजप सरकारचा त्यामागे संदर्भ होता.

मिनी मंत्रालयाच्या नाड्या भाजपला आपल्या हाती हव्यात

स्वबळाच्या दिशेने जाताना भाजपला सत्तेच्या नाड्या आपल्या हाती असल्याशिवाय आगेकूच करता येणार नाही हे स्पष्ट आहे. साधने आणि संपत्ती असतानाही सत्ता हाती असेल तरच त्याचा उपयोग करता येतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे आपले संख्याबळ कमी असले तरी स्वबळाच्या दृष्टीने आगेकूच करण्यासाठी व थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरांच्या नेतृत्वापाठोपाठ आता मिनी मंत्रालयाची सूत्रे आपल्या हाती हवी आहेत.

अध्यक्षपदाच्या मुश्रीफ यांच्या दाव्याला चंद्रकांत पाटील यांचा छेद

मुश्रीफ यांच्या दाव्याला छेद देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि जनसुराज्य यांचे संख्याबळ 18 होते. केवळ दोन जागांचा फरक आहे आणि अध्यक्षपदाचा निर्णय एका ओळीचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपला मिळायला हवे, असा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT