Kolhapur Son In Law Father In Law Tattoo: इचलकरंजीतल्या टॅटू आर्टिस्ट स्वप्नील जाधव यांच्या स्टुडिओत एका आश्चर्यकारक टॅटू काढण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात या अजब टॅटूची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या हातावर टॅटू काढला तो आहे जावई अन् ज्यांचा टॅटू काढला आहे ते आहेत सासरे.. यामुळं जावई-सासऱ्याच्या या दुर्मिळ प्रेमळ नात्याची चर्चा तर होणारच!
वडील हे नातं रक्ताचं असतं… पण काही वेळा आयुष्यात अशी माणसं येतात, जी रक्ताचं नातं नसतानाही वडिलांपेक्षा कमी नसतात. त्याच ऋणाची परतफेड करण्यासाठी एका जावयाने चक्क आपल्या सासऱ्यांचा चेहराच हातावर गोंदवून घेतला. ही अनोखी कहाणी आहे कर्नाटकातील निपाणीच्या आकाश गोसावी यांची!
सात वर्षांपूर्वी आकाशच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर लग्न झालं. मात्र लग्नानंतर घरात काही वाद निर्माण झाल्याने सासरे राम गोसावी यांनी आकाशला आपल्या घरी आणलं. गेल्या सहा वर्षांपासून आकाश पत्नी अनिता यांच्यासोबत कणकवलीत सासऱ्यांच्या घरीच राहतोय.
इतकंच नाही, तर राम गोसावी यांनी आकाशला व्यवसायासाठी ट्रकदेखील घेऊन दिला. त्यामुळे सासऱ्यांनी दिलेल्या या आधाराला आकाशने अनोख्या पद्धतीने सलाम केलाय. सासऱ्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळलं, प्रेम दिलं, आधार दिला आणि म्हणूनच आकाशने राम गोसावी यांचा फेस टॅटू थेट आपल्या हातावर गोंदवून घेतला.
कोल्हापुरातल्या इचलकरंजीतील टॅटू आर्टिस्ट स्वप्नील जाधव यांच्या स्टुडिओमध्ये हा टॅटू साकारण्यात आलाय. सासरे-जावयाच्या या अनोख्या नात्याची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.