Corruption Pudhari
कोल्हापूर

Shirdhon Gram Panchayat corruption: शिरढोण ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी ठप्प; तक्रारदारही गप्प!

२१ त्रुटींवर सविस्तर अहवालाचे आदेश कायम; मात्र कारवाई रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी..

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शिरढोण ग्रामपंचायतीतील १५ वा वित्त आयोग निधी, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वसुली खर्चातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी अद्यापही कारवाईच्या टप्प्यावर पोहोचलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चौकशी अहवालातील २१ त्रुटींवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले असले, तरी त्यानंतरही कोणतीही ठोस प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई झालेली नसल्याने हे प्रकरण नेमके कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यापूर्वी सादर करण्यात आलेल्या अहवालावर अपूर्ण व अस्पष्ट असल्याचे ताशेरे ओढत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी गटविकास अधिकारी विजय परीट यांना प्रत्येक मुद्द्यावर जबाबदार अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांची नावे तसेच प्रस्तावित कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही अंतिम अहवाल व कारवाईबाबत कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणारे तक्रारदारही सध्या शांत असल्याची चर्चा गावात रंगली आहे. त्यामुळे "अजून किती दिवस हे प्रकरण चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यात अडकून राहणार?" तसेच "कारवाई नेमकी का थांबली?" असे प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अंतिम अहवालानंतर दोषींवर ठोस कारवाई होणार की हे प्रकरण पुन्हा कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारवाईच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ

शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. २१ मुद्द्यांवरील सविस्तर अहवाल अद्याप प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. दोषींवर कारवाई कधी होणार, की हे प्रकरण पुन्हा दप्तरातच राहणार, अशी चर्चा गावभर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT