Shahuwadi PM Surya Ghar Muft Bijli Yojana news
सुभाष पाटील
विशाळगड : शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे पाऊल टाकत, महावितरणच्या 'स्मार्ट सूर्यघर' वीज योजनेंतर्गत शाहुवाडी तालुक्यातील तब्बल २९ हजार ९८४ घरगुती ग्राहक या योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र ठरले आहेत. महावितरण कार्यालयात मोफत अर्ज नोंदणी करून दिली जात असल्याची माहिती शाहुवाडीचे उपकार्यकारी अभियंता प्रविण कुंभारे यांनी दिली.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मिळणारे भरघोस अनुदान. ज्यांचे वीज बिल १०० युनिटपेक्षा कमी आहे, त्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान मिळणार आहे. १ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार, तर राज्य सरकारकडून १० ते १७ हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
२५ वर्षे मोफत वीज
१ किलोवॅटच्या संचातून महिन्याला किमान १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. घरातील वापराव्यतिरिक्त उरलेली वीज महावितरणला विकून ग्राहकांना आर्थिक उत्पन्न मिळवण्याचीही संधी आहे. २५ वर्षांच्या हमीसह मिळणारी ही 'मोफत वीज' ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरेल. ६ ऑक्टोबर २०२५ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पात्र नागरिकांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. बांबवडे विभागात सर्वाधिक ७ हजार १४२ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ शाहुवाडी (६५२५), भेडसगाव (५९७१), वारुळ (४३१३), सरुड (२५६५), मलकापूर (१७९८) आणि कापशी (१६७०) अशा एकूण २९ हजार ९८४ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानामुळे आता सामान्यांच्या छतावर सौर पॅनेल झळकणार असून, यामुळे तालुक्यातील वीज प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
विभागावर पात्र लाभार्थ्यांची आकडेवारी:
बांबवडे : ७,१४२
शाहुवाडी : ६,५२५
भेडसगाव : ५,९७१
वारुळ : ४,३१३
सरुड : २,५६५
मलकापूर : १,७९८
कापशी : १,६७०
"शाहुवाडी तालुक्यातील पात्र ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सौरऊर्जेचा स्वीकार करून आपले वीज बिल शून्य करण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी."— प्रविण कुंभारे, उपकार्यकारी अभियंता, शाहुवाडी