

मुंबई : येत्या एक एप्रिलपासून राज्यभरातील वीज दरांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावरील भार लक्षणीयरीत्या कमी होणार असून विशेषतः कमी वीज वापरणार्या कुटुंबांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
नवीन दरपत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. 0 ते 100 युनिट वापरणार्या ग्राहकांसाठी आता प्रतियुनिट 4.3 रुपये दर आकारला जाईल. हा दर गेल्यावर्षी 4.76 रुपये होता. म्हणजेच यात सुमारे 9.7 टक्के घट झाली आहे. तसेच 101 ते 300 युनिटसाठी 10.8 टक्के कपातीसह 7.1 रुपये प्रतियुनिट दर निश्चित करण्यात आला आहे. मध्यमवर्गीय आणि अधिक वीज वापरणार्या ग्राहकांनाही दिलासा मिळाला असून, 301 ते 500 युनिटसाठी आता 13.55 रुपयांऐवजी 11.64 रुपये (14 टक्के कपात) मोजावे लागणार आहेत. तसेच, 500 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी प्रतियुनिट 12.64 रुपये दर लागू होईल.
महावितरणच्या ग्राहकांनाही फायदा
राज्य वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणार्यांसाठी सर्वात स्वस्त दराची तरतूद केली आहे. महावितरणच्या ग्राहकांनाही या कपातीचा थेट फायदा त्यांच्या एप्रिल महिन्याच्या बिलात दिसून येईल. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जेव्हा विजेचा वापर वाढतो, तेव्हा वीज दरात झालेली ही कपात सर्वसामान्यांसाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.