शिरढोण : शिरढोण-टाकवडे परिसरात सोलर पॅनलच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरढोण-नांदणी रस्त्यालगतच्या शेतांमध्ये बसविण्यात आलेल्या सोलर यंत्रणेच्या केबल रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेल्या जात आहेत. टाकवडे परिसरातही वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
सोलर पंप योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून सोलर यंत्रणा उभारल्या आहेत. मात्र, केबल चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. चोरीनंतर सोलर पंप बंद पडत असल्याने पिकांच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत होत आहे. परिणामी शेतीकामांवर परिणाम होत असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्याप चोरट्यांचा छडा लागलेला नाही.
दरम्यान, शिरोळ व कुरुंदवाड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरीच्या घटनांवर आळा घालावा, तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
...सोलर यंत्रणावर चोरट्यांची नजर
तांब्याच्या केबलमुळे चोरट्यांचा डोळा सोलर यंत्रणांवर ग्रामीण भागात सोलर पंप व सोलर पॅनलचे प्रमाण वाढत असताना तांब्याच्या केबल चोरीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. तांब्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याने चोरटे सोलर यंत्रणांना लक्ष्य करत असल्याचे बोलले जात आहे.