

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला पोहोचला असून, गल्लोगल्लीत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. पूर्वी केवळ रात्रीच्या वेळी दिसणारे हे कुत्रे आता दिवसाढवळ्याही हिंसक होऊ लागले असून, लहान मुले आणि महिलांना लक्ष्य करत असल्याच्या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा परिसरात गेल्या दोन दिवसांत भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा भयानक चेहरा समोर आला. खेळणाऱ्या एका लहान मुलाचा कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला, त्याला जमिनीवर पाडून त्याचा लचका तोडला. ही घटना ताजी असतानाच, याच भागात एका महिलेवरही कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवून तिला जखमी केले. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पालकांना आपल्या मुलांना घराबाहेर पाठवताना विचार करावा लागत आहे.
शहरातील मुख्य नाक्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर कुत्र्यांनी जणू आपला ताबाच मिळवला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे ही कुत्री मोठ्या वेगाने धावतात. यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात झाले आहेत. दिवसा पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे आणि रात्री वाहनांचा पाठलाग करणे, यामुळे एकटे-दुकटे फिरणे आता धोक्याचे बनले आहे.
कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्याही ५० हजारांच्या पार गेली आहे. मात्र, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. प्राणीमित्रांच्या विरोधाच्या भीतीने महापालिकेने कुत्र्यांना पकडण्याची कारवाई थंडावली आहे. तसेच, कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या प्रक्रियेतही सातत्य नसल्याने त्यांची संख्या बेसुमार वाढत चालली आहे.
एकेकाळी कुत्र्यांची भीती केवळ गुन्हेगारांना वाटायची, मात्र आता सर्वसामान्य नागरिकच या कुत्र्यांच्या निशाण्यावर आले आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबतच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ही शहराची एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता, निर्बीजीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना या जाचातून मुक्त करावे, अशी आग्रही मागणी आता त्रस्त कल्याण-डोंबिवलीकरांकडून केली जात आहे.