Stray dogs issue : पाली शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,प्रशासनाबाबत तीव्र नाराजी
Stray dogs issue
पाली शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट pudhari photo
Published on
Updated on

पाली : पाली नगरपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून शहरातील हट्टाळेश्वर चौक, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालय परिसर, जुने बसस्थानक, गांधी चौक आदी भागांत कुत्र्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दिवसाढवळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे कुत्र्यांचे टोळके धावत सुटत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वेळा चालकांचे नियंत्रण सुटून किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Stray dogs issue
Stray Dog : कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा थरार; ५० हजार कुत्र्यांच्या फौजेमुळे नागरिक दहशतीखाली

रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत असून एकट्या-दुकट्या जाणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शाळेत जाणारे विद्यार्थी, सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक तसेच उशिरा कामावरून परतणारे कामगार हे या समस्येचे मुख्य बळी ठरत आहेत. काही नागरिकांना चावल्याच्या घटना घडल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

नगरपंचायतीकडून मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कुत्र्यांचे निर्बंधन, नियमित लसीकरण, तसेच पुनर्वसनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे. मात्र प्रत्यक्षात या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस कृती आराखडा तयार करून ही समस्या मार्गी लावावी, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा पालीकरांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

Stray dogs issue
Stray Dogs Problem: भोसरीत भटकी कुत्री जोमात; प्रशासन कोमात

दरम्यान, मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बाजारपेठ परिसरात एका दुचाकीस्वाराच्या मागे कुत्र्यांचा कळप धावल्याने तो घसरून पडला आणि किरकोळ जखमी झाला. तसेच गांधी चौक परिसरात एका नागरिकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली असून संबंधित व्यक्तीला तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम घेण्याचा सल्ला दिला आहे.

याशिवाय, रात्रीच्या वेळी अचानक कुत्रे समोर आल्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही नागरिकांनी खासगी दवाखान्यांत उपचार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे केवळ त्रासच नव्हे तर आरोग्य आणि जीवितासही धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सतर्कता, संयम हेच अपघात टाळण्याचे मुख्य साधन

मोकाट कुत्र्यांचा वावर असलेल्या भागातून पायी जाताना नागरिकांनी घाबरून पळू नये. कुत्र्यांच्या नजरेला नजर भिडवणे किंवा त्यांना दगड मारणे टाळावे. शांतपणे, हळूहळू पुढे सरकणे आणि शक्य असल्यास काठी किंवा एखादी वस्तू हातात ठेवणे सुरक्षित ठरते.लहान मुलांना एकटे अशा भागात पाठवू नये. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी किंवा रात्रीच्या वेळी फिरताना अधिक सतर्कता बाळगावी. कुत्र्यांचा कळप दिसल्यास पर्यायी मार्गाचा वापर करणे हितावह आहे.

दुचाकीस्वारांनी विशेषतः रात्री वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा. रस्त्यावर अचानक कुत्रे आल्यास घाबरून ब्रेक मारल्यामुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.वाहन चालवताना हेडलाईट योग्य स्थितीत ठेवणे, हॉर्नचा वापर करणे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता आणि संयम हेच अपघात टाळण्याचे मुख्य साधन आहे, अशा सूचना पोलीसांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news