कोल्हापूर

कोल्हापूर : दूधगंगा नदी काठावरील गावांत दुफळी पाडण्याचा डाव हाणून पाडू : दूधगंगा बचाव कृती समिती

मोहन कारंडे

दतवाड; पुढारी वृत्तसेवा : सुळकूड येथून इचलकरंजीला मंजूर झालेल्या अमृत योजनेला विरोध वाढत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी इतर विविध पर्यायांची चाचपणी सुरू करून दूधगंगा नदी काठावरील गावांत दुफळी निर्माण करण्याचा डाव रचला आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दत्तवाड (ता. शिरोळ) येथे आयोजित बैठकीत देण्यात आला.

१७ फेब्रुवारीला सुळकूड येथील दूधगंगा नदीच्या धरणावर होणाऱ्या पाणी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत दूधंगेतून इचलकरंजीला एक थेंबही पाणी न देण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. बैठकीला दत्तवाडसह सुळकूड, सांगाव गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले की, काही वर्षांपूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी पात्रात उतरून प्रदूषण दूर करण्यासंदर्भात आंदोलन केले होते. आता त्यांना कदाचित त्याचा विसर पडला आहे. देशातील पंचगंगेपेक्षा अधिक प्रदूषित नद्या योग्य उपाय योजनेद्वारे शुद्ध होऊ शकतात तर पंचगंगा का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमोल शिवई म्हणाले की, योजनेला आमचा विरोध दूर करण्यासाठी आम्हाला अनेक प्रस्ताव देण्यात आले. मात्र आमच्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाची डाळ शिजली नाही. त्यामुळे ते सुळकूडच्या खालील गावात चाचपणी करीत आहेत. त्यांनी लक्षात ठेवावे दूधगंगा नदीकाठ एकसंध असून कोणत्याही परिस्थितीत ही योजना यशस्वी होऊ देणार नाही.

ग्रा.पं. सदस्य संजय पाटील म्हणाले की, दूधगंगा नदीवरील काळमवाडी धरणाकरिता कागल, राधानगरी, भुदरगड, शिरोळसह कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दान दिल्या. या पाण्यावर प्रकल्पग्रस्त लोकांचा पहिला अधिकार आहे. या प्रकल्पातील पाण्यातून अजून पूर्ण सिंचन झालेले नाही. तरीही प्रशासन दूध गंगेचे पाणी लाभ क्षेत्रात नसणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेला घेऊन जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रा.पं. सदस्य बाबुराव पवार, संजय पाटील, देवराज पाटील, डी.एन. सिदनाळे, एन.एस. पाटील, ए.सी.पाटील, ए.ए.पाटील, सुळकूडचे उपसरपंच शरद धुळुगडे, युवराज पाटील, अमोल शिवई, कसबा सांगाव येथील मनोज कोडोले, रोहित व्हटकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT