…तर तुमचाही शशिकांत वारिसे करू; मलाही धमक्‍या : संजय राऊत | पुढारी

...तर तुमचाही शशिकांत वारिसे करू; मलाही धमक्‍या : संजय राऊत

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला आहे. रिफायनरीला जो विरोध करेल त्‍यांना संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे. वारिसे हे रिफायनरीला विरोध करणाऱ्यांचा आवाज होते. हे काही नेत्‍यांच्या डोळ्यात खूपत होते. त्‍यामुळे सत्‍ताधारी पक्षातील नेत्‍यांचा वारिसे हत्‍या प्रकरणात हात आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. याला सर्वस्‍वी सरकार जबाबदार असल्‍याने सरकारने वारिसे यांच्या कुटुंबियांना तात्‍काळ ५० लाख रूपयांची मदत द्‍यावी अशी मागणीही त्‍यांनी केली. तसेच वारिसे यांच्या आधी आणखी काही लोकांच्या हत्‍या झाल्‍या असून, त्‍याच्या पुढची ही कडी आहे. त्‍यामुळे केंद्रीय गृहखात्‍याने पथक पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्‍यांनी केली.

दरम्‍यान हा मुद्दा तुम्‍ही उचलू नका नाहीतर तुमचाही मुंबईत वारिसे करू अशी मला आज दोनवेळा धमकी आल्‍याचा आरोप राऊत यांनी केला. मी अशा धमक्‍यांना घाबरत नाही. आम्‍ही कोकणात जाणार. वारिसे कुटुंबियांना भेटणार असून, वारिसे यांचं बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. कोकणात शिवसेना कोकणवासीयांच्या नेहमी पाठिशी आहे आणि राहणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

वारिसे हत्‍येमागचा खरा सूत्रधार कोण हे गृहमंत्र्यांना माहिती आहे.. 

वारिसे मृत्‍यू प्रकरणात ज्‍या आरोपीला अटक केली आहे. त्‍याचा खरा सूत्रधार कोण आहे याची माहिती गृहमंत्र्यांना, मख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्‍या दोषींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्‍ही शांत बसणार नाही. वारिसेंची हत्‍या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी आहे. अंगणेवाडीतील भाजपच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी वारिसे यांची हत्‍या झाली. हा योगायोग समजावा का? असा प्रश्न त्‍यांनी उपस्‍थित केला.

रिफायनरीजवळ सत्‍ताधारी पक्षातील नेत्‍यांनी जमिनी घेतल्‍या… 

रिफायनरीजवळ सत्‍ताधारी पक्षातील नेत्‍यांनी जमिनी घेतल्‍या आहेत. त्‍यांची नावे आपल्‍याकडे आहेत. ती लवकरच आपण समोर आणणार असत्‍याचं राऊत यांनी म्‍हटलंय.

रिफायनरीच्या विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवा.. 

रिफायनरी प्रकल्‍पाला ज्‍यांचा विरोध आहे अशांना खोट्‍या गुन्ह्यात अडकवा अशा सूचना जिल्‍हाधिकाऱ्यांना आल्‍याचा आरोप राऊत यांनी केला. पोलिसांवरही दबाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर केला जायचा, आता मात्र हत्‍याच होत आहेत. हे लोकशाहीला मारक असून, कोकणात सत्‍ता बदलल्‍यावर हत्‍येचं सत्र सुरू झालं आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना उखडून टाकण्याची भाषा केली जात आहे. जोपर्यंत या हत्‍येमागील खऱ्या सूत्रधाराला अटक होत नाही तोपर्यंत आम्‍ही शांत बसणार नाही. आम्‍ही कोकणवासीयांच्या पाठिशी आहोत अशी भूमीका राऊत यांनी मांडली आहे.

हेही वाचा : 

Back to top button