राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्यात राष्ट्रवादी टार्गेटवर; सहा ते सात नगरसेवक आघाडीच्या वाटेवर

राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्यात राष्ट्रवादी टार्गेटवर; सहा ते सात नगरसेवक आघाडीच्या वाटेवर

ठाणे; प्रवीण सोनावणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे गटाच्या टार्गेटवर आला आहे. मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा-मुंब्रा मतदार संघालाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर हणमंत जगदाळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून ठाण्यातही शिंदे गटाने राष्ट्रवादीला सुरुंग लावला आहे. गणेश नाईक आणि निरंजन डावखरे हे दोन नेते राष्ट्रवादीच्या गटबाजीमुळे फार पूर्वीच भाजपमध्ये गेले असल्याने आता सध्या ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे त्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्यात मतदार संघात कोंडी करून शिंदे गटाच्या टार्गेटवर राष्ट्रवादीच असल्याचे निश्चित झाले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत खटके उडत होते. विशेष करून राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि तत्कालीन महापौर तसेच आताचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात यापूर्वीही आरोपांच्या फैरी उडाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्षही हा नवा नाही. खारेगांव उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरूनही दोन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळाला. हा संघर्ष इथेच थांबला नसून राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही संघर्षाची धार अधिक धारधार झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आव्हाड यांनी सरकारवर उघडपणे टीका केली होती. तर ट्विटरच्या माध्यमातूनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्यात राष्ट्रवादी यापूर्वी देखील फुटली होती. परंतु तरीसुध्दा ती कळवा, मुंब्य्रामुळे सावरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीत यापूर्वी देखील तीन गट होते. गणेश नाईक, वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड असे तीन गट होते. परंतु वसंत डावखरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र निरंजन डावखरे आणि गणेश नाईक यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक यांच्यावरही ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावेळी आरोप करण्यात आले होते. त्यानंतरही राष्ट्रवादी ठाण्यात तरली असल्याचे दिसून आले आहे. परंतु मागील सहा महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आता आव्हाड हेच बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढील लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यात कळवा, मुंब्य्रातून त्यांना हद्दपार करण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेने आखलेल्या पहिला प्रयोग जवळ जवळ यशस्वी झाला आहे. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे पाच ते सात नगरसेवकांनी आता वेगळी चूल मांडली असून मुंब्रा विकास आघाडी उघडली आहे. तर क्लस्टरसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावा माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला असला तरी, ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कंटाळूनच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१२ फेब्रुवारीला प्रवेश निश्चित! सहा ते सात नगरसेवक आघाडीच्या वाटेवर

ठाणे महापालिकेचा कार्यकाळ सध्या संपुष्टात आला आहे. ठाणे महापालकेतील राष्ट्रवादीच्या संख्याबळाचा विचार केल्यास ३४ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणून आले होते. यामध्ये आता मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून सहा ते सात नगरसेवक या आघाडीत जाण्याची चिन्हे आहेत. यामागे शिंदे गटच असल्याची चर्चा आहे. तर आता हणमंत जगदाळे यांच्यासह चार नगरसेवकही शिंदे गटात जाणार असल्याचे जाहीर झाल्याने राष्ट्रवादी पूर्णपणे पोखरली जाणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का देण्याचे तंत्र बाळासाहेबांच्या शिवसेनेने आखले आहे. त्यात नजीब मुल्ला कुठेही जाणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून वारंवार केला जात असला तरी देखील त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छा नंतर पुन्हा तर्कविर्तक लावले जात आहेत. त्यात कळव्यातील माजी नगरसेवक जीतू पाटील यांची देखील त्यांच्या घरी जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनधरणी केली होती. परंतु त्यांनी देखील आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कास धरली आहे. त्यांचा देखील १२ फेब्रुवारीला प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र काही घरगुती कारणास्तव हा प्रवेश लांबणीवर गेला असला तरी, ठाण्यात राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आणण्याचे टार्गेटच शिंदे गटाने घेतले आहे कि काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news