डसी चोरीमुळे नागाव आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Theft Case | नागावात चोरट्यांचा धुमाकूळ! पोलीस अधिकाऱ्याच्या घरासह ३ ठिकाणी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास

भरवस्तीत कडीकोयंडे उचकटून डल्ला; ५ ते ६ चोरटे सीसीटीव्हीत कैद, परिसरात भीतीचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Hatkanangale Nagaon House Burglary

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच गल्लीतील तीन घरे लक्ष्य करत चोरट्यांनी सुमारे १३ ते १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये ११ तोळे सोने, चांदी आणि रोख रकमेचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी झालेल्या घरांमध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या (API) घराचाही समावेश आहे. या धाडसी चोरीमुळे नागाव आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

एपीआयच्या घरातच धाडसी चोरी!

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बाबर यांचे कुटुंब नागावच्या माळवाडी परिसरात राहते. मंगळवारी रात्री बाबर यांना कामावरून घरी येण्यास उशीर होणार होता. रात्रीच्या वेळी आई-वडिलांची झोपमोड होऊ नये, म्हणून त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावून चावी खिडकीत ठेवली आणि आई-वडील वरच्या मजल्यावर झोपायला गेले.

काही कारणास्तव एपीआय बाबर रात्री घरी पोहोचू शकले नाहीत. याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप व कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील ११ तोळे सोने, ६ भार चांदी आणि ७ हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले.

एकाच रात्री तीन ठिकाणी डल्ला

चोरट्यांनी केवळ पोलीस अधिकाऱ्याच्याच नव्हे, तर त्याच गल्लीतील इतर दोन ठिकाणांनाही लक्ष्य केले. सागर सदाशिव सावंत (किराणा व टेलरिंग दुकान): चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील २२ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

बाबासो सावंत (घर): चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला, मात्र सुदैवाने त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

पाच ते सहा चोरटे सीसीटीव्हीत कैद

महत्त्वाची घडामोड: चोरीची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मध्यरात्रीच्या सुमारास ५ ते ६ संशयित चोरटे दबा धरून वावरताना स्पष्टपणे दिसत आहेत.

पोलीस यंत्रणा सतर्क; तपास वेगाने सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पोवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

तपासासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला आणि तो गल्लीतच घुटमळला. यामुळे चोरटे वाहनाचा वापर करून पसार झाले असावेत, असा संशय आहे. शिरोली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस चोरट्यांच्या शोधात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT