

Peth Vadgaon Woman Brutally Killed
पेठवडगाव : पेठवडगाव शहरातील एस.टी. स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कॉम्प्लेक्ससमोर भर पावसात महिलेचा धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. अमृता दीपक कांबळे (रा. सावर्डे ता. हातकणंगले ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.७) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वडगाव शहरातील स्टॅन्ड पाठीमागून कोल्हापूरला जाणाऱ्या गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पतीवर संशय व्यक्त केला जात आहे. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यात अमृता कांबळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. भर पावसात ही घटना घडल्याने परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून रक्ताचे नमुने व अन्य पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या हत्येमागे घरगुती कारण असल्याचा प्राथमिक अंदाज असून पतीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
भरदिवसा, शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे वडगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.