

कोल्हापूर : व्यवसायात आर्थिक अडचणीत आलेले चार जण एकत्र आले...पैशाची गरज भागविण्यासाठी दुचाकींची चोरी सुरू केली. बघता बघता या चौघांनी सांगली, गोव्यात जाऊन दुचाकी चोरींचा सपाटाच लावला. स्थानिक गुन्हे शाखेने चौघा सराईत चोरट्यांना अटक करून सोलर पॅनेल, सहा दुचाकी, १३०० मीटर केबल असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मोहसीन नजमुद्दीन मोमीन (वय ३८, रा. मानेनगर, रुई, हातकणंगले), अनिल मल्लाप्पा गावडे (२४, रा. इचलकरंजी), राहुल राजेश गुरव (३१, रा. कोरोची, हातकणंगले, मूळ रा. बेळगाव) व प्रवीण आदिकुमार गिरमल (रा. अब्दुललाट, शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात केबल चोरी, सोलर पॅनेलच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जिल्ह्यातील या सर्व घटना एकत्र करून त्यांचा तपास सुरू केला होता.
हातकणंगले येथील काही चोऱ्यांमध्ये मोहसीन मोमीन साथीदारांसह सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. चोरीच्या केबल विक्रीसाठी तो रुई फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार नवनाथ कदम व सचिन जाधव यांना मिळाली होती. या नुसार पथकाने सापळा रचून या मोहसीनला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनायक चौगले, अरविंद पाटील, महेश आंबी, सतीश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
कोल्हापूर, सांगली, गोव्यात चोरी
अटक केलेल्या चौघांनी वडगाव, शाहूपुरी, कुरूंदवाड, मिरज, गोवा येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. हातकणंगलेतून दोन सोलर पॅनेलही चोरट्यांनी पळवून नेले होते. चैनीसाठी आणि व्यवसायात आलेली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली.