Gokul Milk Union  Pudhari
कोल्हापूर

Gokul Dairy Kolhapur news | “गोकुळच्या मलईवर राजकारण्यांचा डोळा"; ग्रामीण दूध उत्पादकांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया

सहकार वाचवायचा असेल तर स्वार्थी राजकारणाला लगाम घालण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

आनंदा केसरे

बांबवडे : गोकूळ दूध संघास दूध पूरवठा करणाऱ्या ग्रामीण भागातील खऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील खदखद आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य दर मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या सहकारी दूध संघांच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना दूध उत्पादकांमध्ये तीव्र होत आहे.

राजकारण्यांचा त्याच्या मलईवर डोळा आहे, त्यामुळे सहकारातून समृद्धी या उदिष्टालाच आता हरताळ फासला जात आहे. परिणामी राजकारण्यांच्या या धडपडीमुळे “गोकुळ” सारख्या प्रतिष्ठित दूध संघाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दूध उत्पादकांचे म्हणणे आहे की, सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी व्हावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी या हेतूने गोकूळ  संघ कै आनंदराव पाटील चुयेकर आणि त्यांच्या सहका-यानी उभा केला. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असून संघाच्या विकासापेक्षा त्यातील आर्थिक ताकद आणि “मलई”वर डोळा ठेवून राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याचा आरोप होत आहे.

संघाच्या व्यवस्थापनातील काही मंडळींकडून वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेतले जात असल्याची चर्चा गावागावात सुरू आहे. दूध दरवाढ, बोनस, पशुखाद्य सवलत यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे सत्तासंघर्ष आणि पदांसाठी चढाओढ सुरू असल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. दूध संकलनासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. जनावरांचे वाढते पालनपोषण खर्च, महागडे खाद्य आणि औषधांच्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी सहकारी संघांनी आधार देण्याऐवजी राजकीय कुरघोड्यांमध्ये अडकणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

“गोकुळ”सारख्या संस्थेची विश्वासार्हता टिकवायची असेल तर संघाचा कारभार पारदर्शक ठेवून खऱ्या दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सहकार वाचवायचा असेल तर स्वार्थी राजकारणाला लगाम घालण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT