Gokul Doodh Sangh Election
आशिष ल. पाटील
गुडाळ : ‘गोकुळ’ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका भाजपच्या गोकुळमधील प्रमुख नेत्या शौमिका महाडिक यांनी मांडल्यानंतर महायुतीचे घटक असलेले आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, बिनविरोध निवडणुकीच्या या चर्चेने ठराव मिळविण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या ठरावदारांच्या पोटात गोळा आला आहे. आपले ‘बहुमोल’ मत वाया जाणार की काय, या धास्तीने गोकुळचे सर्वसामान्य मतदारही अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.
गोकुळची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षांच्या शह-काटशहाच्या राजकारणाने रंगली आहे. जास्तीत जास्त ठराव आपल्या गटाकडे यावेत, यासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी टोकन पोहोचले, तर काही दूध संस्थांमध्ये ठराव मिळविण्यासाठी अक्षरशः लिलावाची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. लाखो रुपयांची बोली लावत ठराव आपल्या पदरात पाडून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
गोकुळची निवडणूक सुरुवातीपासूनच महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांची समविचारी आघाडी, अशी होण्याचे संकेत होते. मात्र, मतदार पात्र-अपात्रतेच्या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच कोल्हापूरपासून दिल्लीपर्यंत न्यायालयीन संघर्ष झाला. हा संघर्ष अद्याप पूर्णपणे संपलेला नाही.
अपात्रतेच्या कारवाईचा फटका बसलेल्या सुमारे १,४०० संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वतंत्र मेळावा घेत महायुतीतील एका घटक पक्षाविरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या सर्व घडामोडींमध्ये निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असा पुनरुच्चार वेळोवेळी केला आहे.
दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचा झंझावाती प्रचार, १,४०० संस्था प्रतिनिधींनी घेतलेली उघड भूमिका आणि महायुतीमध्ये संधी न मिळालेल्या इच्छुकांची संभाव्य नाराजी, या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक मताला मोठे ‘मोल’ प्राप्त होईल, असा ठरावदारांचा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेने मोठी गुंतवणूक करून ठराव मिळविलेल्या ‘गुंतवणूकदारां’सह सर्वसामान्य मतदारही अस्वस्थ झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज माघारीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत बिनविरोधचा फॉर्म्युला प्रत्यक्षात येतो की निवडणुकीचा रणसंग्राम रंगतो, हे स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीपूर्वी झालेल्या संघर्षाचा आपल्या उमेदवारांना अंतर्गत फटका बसू नये, यासाठी महायुतीतील एका घटक पक्षाकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. विरोधी आघाडीला सन्मानजनक जागा देऊन निवडणुकीचा धोका टाळावा आणि त्यातून आपला ‘मोका’ साधावा, अशी या घटक पक्षाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकणाऱ्या ‘देवाभाऊं’ना या सर्व राजकीय घडामोडी आणि बारकावे सांगण्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.