

कोल्हापूर : राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष मिळून ३,५०० ठराव असल्याचा आकडा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे सांगत आहेत, त्या वक्तव्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे? याद्वारे भाजपची ताकद गौण असल्याचा संदेश दिला जात आहे का? भाजपला वेगळे गृहीत धरून काही स्वतंत्र राजकीय गणिते मांडली जात आहेत का? असा सवाल करत तसे नसेल, तर या आकड्याचे राजकारण जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
मुश्रीफ यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यावर खा. महाडिक यांनी सोमवारी पत्रक काढून पलटवार केला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे, असे अजूनतरी आम्हाला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वानेही त्यांची भूमिका स्पष्ट करावी. काही जण स्वतःच महायुतीची रचना ठरवत असल्याच्या अविर्भावात बोलत आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळूनच घेतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरून कोणीही अंतिम भूमिका जाहीर करण्याचा प्रयत्न करू नये, असेही या पत्रकात म्हटले आहे.
यापूर्वी ‘अदृश्य शक्ती’, ‘मोठा भाऊ’ अशा संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. महायुतीत कोण मोठा, कोण लहान हा प्रश्न नाही; पण वारंवार अशा प्रकारे विशिष्ट पक्षाचे, नेतृत्वाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. महायुतीच्या चेअरमनपदाबाबत विविध कथा सांगितल्या जात आहेत. मात्र, त्या काळात चेअरमनपदाच्या प्रश्नावर सर्वाधिक ठाम भूमिका कोणी घेतली होती? अरुण डोंगळे हे कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते? त्यांनी चेअरमनपदाची अट घालून राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर चेअरमन कोण झाला? हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे त्या निर्णयांचे खापर मुख्यमंत्री किंवा तथाकथित ‘अदृश्य शक्ती’वर फोडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. भाजपला डावलून कोणतेही राजकीय समीकरण पूर्ण होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार किंवा सूचक आणि सोबत एक अशा दोनच व्यक्तींना निवडणूक कार्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याच्या प्रक्रियेदरम्यान वाहतुकीचेही नियोजन केले आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशी, निवडणूक कर्मचारी व उमेदवार यांची वाहने वगळून रमणमळा ते धोबीघाटपर्यंत अन्य वाहनांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे. धोबी घाट ते धान्य गोडाऊन या मार्गावर सर्व वाहनांस प्रवेश बंद केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व स्टाफ यांच्या वाहनांकरिता तसेच इतर शासकीय वाहनांकरिता बहुउद्देशीय हॉलचे उजवे बाजूस, तर लोकप्रतिनिधी यांच्या वाहनांकरिता बहुउद्देशीय हॉलचे डाव्या बाजूस, तर उमेदवार यांच्या वाहनासाठी धोबीघाट समोरील जागा ही पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे. इतर सर्व वाहनाकरिता पोस्ट ऑफिस ते पितळी गणपती मार्गावरील रोडचे कडेला पार्किंगची सुविधा आहे, त्यामुळे निवडणूक कार्यालय आवारात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.