Gokul Election | ‘गोकुळ’ची रणधुमाळी आजपासून

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणार प्रारंभ; राजकारण तापणार
Gokul Election  |
Gokul Election | pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारी (१५ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमधील निवडणूक कार्यालयात ही सर्व प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असल्याने मंगळवारपासून गोकुळचे राजकारण तापणार आहे.

निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी गटनिहाय नऊ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून अर्ज विक्रीसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे.

उमेदवारी अर्जासह निवडणूक नियमावली घेण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच मतदार यादीसाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी निवडणूक कार्यालयात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

२५ संचालकांची होणार निवड

गोकुळमध्ये यंदा क्रियाशील सभासदांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २५ संचालकांची निवड होणार आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गातून २०, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, महिला प्रवर्गातून दोन, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एक आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून एका संचालकाचा समावेश आहे. त्यामुळे या विविध प्रवर्गांतील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हालचालींना आता वेग येणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

१५ ते २२ सप्टेंबर : उमेदवारी अर्ज दाखल करणे

२३ सप्टेंबर : अर्जांची छाननी

२४ सप्टेंबर : वैध अर्जांची यादी प्रसिद्ध

२५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर : अर्ज माघारीची मुदत

९ ऑक्टोबर : अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप

१८ ऑक्टोबर : मतदान

१९ ऑक्टोबर : मतमोजणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news