

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत दूध संस्थांच्या पात्र-अपात्रतेच्या लढ्यात काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील आमच्या खांद्यावर बसून गेले. अवसायनातील दूध संस्था पात्र ठरविण्यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्यात आ. पाटील यांचा एक टक्काही वाटा नाही, हे संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्षाचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. संस्थांसाठी लढत असल्याचे चित्र तयार करत सतेज पाटील सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढायचे निश्चित असताना अदृश्य शक्तीकडून दूध संस्था अपात्र करण्याचा घाट का घातला जात आहे? संस्थांमध्ये रोष असताना आता पुन्हा या संस्थांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांना पुन्हा डिवचण्याचे काम त्यांनी केले आहे. संस्थांना किती चिडवायचे हे समजले पाहिजे. अदृश्य शक्तीने यामध्ये शक्ती वाया घालवण्याऐवजी गोकुळमध्ये जास्ती जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.
मित्र पक्षांनाच त्रास कशासाठी?
अवसायनातील संस्थांमध्ये ८५ टक्के संस्था राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यच्या आहेत. केवळ १५ टक्के संस्था या काँग्रेसच्या आहेत. महायुती म्हणून गोकुळची निवडणूक एकत्र लढायची आहे, तरीही मित्र पक्षांनाच अदृश्य शक्तीकडून त्रास दिला जात असल्याची खंत तिन्ही पक्षांमध्ये असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
अर्धवट ज्ञानी सापडल्याने नुकसान
सहकारातील एखादा अर्धवट ज्ञानी सापडला आणि त्याचे ऐकून राजकारण केले, तर काय नुकसान होते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अदृश्य शक्ती आहे. मित्र पक्षांविरोधातच लढा देऊन त्यांना काय मिळाले, असा प्रश्नही मंत्री मुश्रीफ यांनी केला.
गोकुळची शेवटची निवडणूक लढणार : अरुण डोंगळे
गोकुळ दूध संघाची शेवटची निवडणूक लढणार असल्याचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले. गोकुळ दूध संघाच्या विकासात गेली ३५ वर्षे योगदान दिल्याचे समाधान असल्याचेही डोंगळे यांनी संपर्क दौर्यादरम्यान एका दूध संस्थेमध्ये आयोजित मेळाव्यात सांगितले. गोकुळमध्ये गेली ३५ वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दोनवेळा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. गोकुळच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेता आले. दूध संघाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान राहिले आहे, असे सांगत डोंगळे यांनी यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गोकुळची पुढील निवडणूक लढणार नसल्याचे डोंगळे यांनी जाहीर केले असले, तरी राजकीय संन्यास घेणार नाही, असेही स्पष्ट करत राजकारण, समाजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.