Accident News pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur accident News : माजी आमदारांच्या गाडीची म्हैशीला धडक.. म्हैशीचे दोन्ही पाय मोडले तर पोटातील रेडकू दगावले

गरीब शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर....

पुढारी वृत्तसेवा

नागाव

सुनील कांबळे : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील टोप-संभापूर येथे काल सायंकाळी अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली. माजी आमदार यांच्या सुसाट गाडीने एका निष्पाप म्हशीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्या मुक्या जनावराचे दोन्ही पाय निकामी झाले असून, तिच्या पोटात वाढणारे सहा महिन्यांचे रेडकू जागीच दगावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार जयश्री जाधव या कोल्हापूरहून वडगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. गाडीचा वेग इतका होता की, झालेल्या जोरदार धडकेमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या म्हशीचे पुढील दोन्ही पाय जागीच मोडले आणि ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. केवळ पाय निकामी झाले एवढेच नाही, तर त्या माऊलीच्या पोटात सहा महिन्यांचा जीव होता. या अपघाताच्या धक्क्याने त्या न जन्मलेल्या रेडकाचा पोटातच मृत्यू झाला. म्हैशीचे दोन्ही पाय निकामी झाल्याने तिला क्रेन च्या साहाय्याने उचलून नेले आहे. ती जगण्याची शक्यता फारच कमी आहे..

शेतकऱ्याच्या संसाराचा कणा मोडला

ही म्हैस टोप-संभापूर येथील गरीब शेतकरी लक्ष्मण यशवंत कारंडे यांच्या मालकीची आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कारंडे यांनी पोटच्या पोरासारखी ही म्हैस सांभाळली होती.

"आमच्या कुटुंबाचा हाच एक मोठा आधार होता. तिच्या दुधावर घर चालायचं आणि पुढच्या काही महिन्यांत घरात नवीन रेडकू येणार होतं... पण एका क्षणात सगळं संपलं. आमच्यावर आभाळच कोसळलंय," अशा शब्दांत कारंडे कुटुंबाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

या अपघातामुळे शेतकरी कारंडे यांचे दिड लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. एका गरीब शेतकऱ्यासाठी दीड लाख रुपये म्हणजे त्याच्या आयुष्याची पुंजी असते. त्यामुळे आता समाजमाध्यमांतून आणि परिसरातून संतप्त भावना व्यक्त होत असून, कारंडे कुटुंबाला त्वरित आणि योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांत नोंद, पण न्याय मिळणार का?

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. लोकप्रतिनिधींच्या गाड्यांचे वाढते वेग आणि त्यामुळे सर्वसामान्यांना किंवा त्यांच्या मुक्या जनावरांना सोसावा लागणारा नाहक त्रास, यावर आता स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्याचा संसाराचा कणा मोडून पडला असताना, आता माजी आमदार आणि प्रशासन या गरीब कुटुंबाला किती लवकर न्याय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT