

Jalgaon crime news
जळगांव: एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरटीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत केली असून, या 'लेडी गँगस्टर'च्या अटकेमुळे बसस्थानकावरील चोऱ्यांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (६२) या २३ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ बसस्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ ग्रॅमची सोन्याची पोत लंपास केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.
तपासाचे चक्र फिरवत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण २२ ग्रॅमची सोन्याची पोत पोलिसांनी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा आणि पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकाँ कांतीलाल केदारे करत आहेत.