कोल्हापूर

भाजप हातकणंगले तालुका अध्यक्षपदाच्या निवडी लवकरच; जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच

अमृता चौगुले

कोल्‍हापूर, (किणी), पुढारी वृत्‍तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीनंतर हातकणंगले तालुका अध्यक्षपदाच्या निवडी लवकरच होणार असून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे, होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांसमोर निवडीचे आव्हान असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी कोल्हापूर महानगर व कोल्हापूर ग्रामीण अशी दोन जिल्हाध्यक्षपदे होती. मात्र पक्षाचा कारभार सोपा व्हावा यासाठी कोल्हापूर महानगरांसह ग्रामीण जिल्ह्यात कोल्हापूर -पूर्व (हातकणंगले लोकसभा मतदारसंघ) व कोल्हापूर- पश्चिम (कोल्हापूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ) अशी तीन जिल्हाध्यक्षपदे करण्यात आली.

कोल्हापूर (पूर्व) ची अध्यक्षपदाची माळ राजवर्धन नाईक- निंबाळकर (शिरोळ) तर कोल्हापूर(पश्चिम)च्या अध्यक्षपदाची माळ राहुल देसाई (गारगोटी) जबाबदारी यांच्याकडे आहे. आता हातकणंगले तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ असल्याने पक्षाच्या रचनेनुसार या ठिकाणी हातकणंगले व इचलकरंजी असे दोन तालुके(मंडल) पूर्वीपासूनच आहेत. हातकणंगले व इचलकरंजी मंडलाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेवर असल्याने व पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडीना महत्व आले आहे. अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सध्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये अमित गाठ(हुपरी),विद्यमान सरचिटणीस सुरेश पाटील (भादोले), लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक जिनेंद्र देसाई (मिणचे),माजी तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील (वाठार), आण्णासाहेब चौगुले(हातकणंगले),नाना जाधव (भादोले), परशुराम चव्हाण(सावर्डे) आदींसह अनेकजण इच्छुक असुन अजूनही इच्छुकांची संख्या वाढतच आहे.

निवडीच्या तारखेबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी या निवडीवर ना.चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांचा प्रभाव असणार आहे,मात्र जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना समान संधी देण्याची कसरत वरिष्ठांना करावी लागणार आहे. पक्षात गेल्या नऊ वर्षात जोरदार इनकमिंग झाले असून त्यांना सांभाळण्याच्या नादात जन संघपासून राबणाऱ्या मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना रुजल्याने या निवडी वरिष्ठांना आव्हान ठरणार आहेत.

नऊ वर्षातील सत्ता

गेल्या नऊ वर्षातील सत्ताकाळात मुळ निष्ठावंत कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ देण्यात पक्ष अयशस्वी ठरल्याने पक्षांतर्गत रोष वाढीस लागला होता. त्यावर उपाय म्हणून सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ नेतृत्वाने निरीक्षक पाठवून जुन्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्यांना सन्मानाचे स्थान देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन हवेतच विरले आता जिल्हा व तालुक्यातील कार्यकरिणीवर जास्तीत जास्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्यावर झालेला अन्यायाचा ठपका पुसण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यातून होत आहे.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT