तब्बल 46 हजार वर्षांपूर्वीची कृमी पुन्हा झाली ‘जिवंत’!

तब्बल 46 हजार वर्षांपूर्वीची कृमी पुन्हा झाली ‘जिवंत’!
Published on
Updated on

मॉस्को : वैज्ञानिकांनी 46 हजार वर्षांपूर्वी बर्फात गोठलेल्या व सुप्तावस्थेत गेलेल्या एका कृमीला पुन्हा 'जिवंत' म्हणजेच सक्रिय केले आहे. ज्यावेळी पृथ्वीवर केसाळ मॅमथ हत्ती, मोठ्या सुळ्यांचे वाघ आणि विशाल एल्क वावरत होते, त्या काळात ही कृमीही अस्तित्वात होती. 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्यूलर सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स'मधील प्रा. एमेरिटस टेयमुरास कुर्जचालिया यांनी सांगितले की हा 'राऊंडवर्म' म्हणजेच गोलकृमी सैबेरियन पर्माफ्रॉस्टमध्ये पृष्ठभागापासून 40 मीटर खोलीवर सुप्तावस्थेत, पण जिवंत होती. तिची प्रजाती अज्ञात आहे. ही कृमी ज्याप्रकारे हजारो वर्षे जिवंत राहिली त्याला 'क्रिप्टोबायोसिस'च्या रूपात जाणले जाते.

क्रिप्टोबायोटिक अवस्थेत जीव पाणी किंवा ऑक्सिजनच्या संपूर्ण अनुपस्थितीत राहू शकतो. याशिवाय अतिशय थंड वातावरणात अत्याधिक क्षारयुक्त स्थितीतही जिवंत राहू शकतो. कुर्जचालिया यांचे म्हणणे आहे की ही जीवन व मृत्यू यांच्या दरम्यानची स्थिती असते. त्यामध्ये चयापचय क्रिया इतकी मंदावते की तिचा सुगावाही लागणे कठीण होते. कोणताही जीव अशा स्थितीत जीवनाला जणू काही 'पॉज' देऊन नंतर योग्य परिस्थिती आल्यावर ते पुन्हा सुरू करू शकतो.

पाच वर्षांपूर्वी रशियातील मृदा विज्ञानाशी संबंधित भौतिक रासायनिक आणि जैविक समस्या संस्थानाच्या वैज्ञानिकांनी सैबेरियन पर्माफ्रॉस्टमध्ये गोलकृमी प्रजातींचा शोध लावला होता. या कृमीला केवळ पाण्याने रिहायड्रेट करून पुन्हा जिवंत करण्यात आले. पुढील विश्लेषणासाठी अशा शंभर कृमींना जर्मनीत नेण्यात आले. या कृमींना बाहेर काढल्यानंतर वैज्ञानिकांनी त्यांचा काळ निश्चित करण्यासाठी पर्माफ्रॉस्टमधील वनस्पतींच्या अवशेषांचे रेडियोकार्बन विश्लेषण केले. त्यावेळी आढळले की ते सुमारे 46 हजार वर्षांपूर्वीचे आहेत. हे कृमी म्हणजे एक वेगळीच प्रजाती असल्याचेही दिसून आले आहे. संशोधकांनी त्यांना 'पॅनाग्रोलायमस कोलीमेनिस' असे नाव दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news